नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील डेंग्यू व मलेरिया हे साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी तसेच डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी नेरूळ सेक्टर ६,८,१० तसेच सारसोळे आणि कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच एलआयजीच्या अंर्तगत भागात आणि चाळींसभोवताली व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० तसेच सारसोळे गाव आणि कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला असून मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. सर्वसामान्य रहीवाशांसह राजकीय संघटनांचे मातब्बर पदाधिकारी मलेरिया व डेंग्यूने बाधित झाले आहेत. सांयकाळनंतर रहीवाशांना तसेच ग्रामस्थांना दारे-खिडक्या बंद करून घ्याव्या लागत आहेत. डासांमुळे सोसायटीच्या आवारात तसेच उद्यानात सांयकाळी फिरणे अवघड झाले आहे. सध्या पावसाने तीन-चार दिवस उसंत घेतली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रभाग ३४ मध्ये डास नियत्रंणासाठी व्यापक प्रमाणावर अभियान उघडून सर्वसामान्य रहीवाशांना, ग्रामस्थांना दिलासा देणे आवश्यक आहे. प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६, ८, १० मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात, एलआयजीच्या अंर्तगत भागात, सारसोळे व कुकशेत गावातील कानाकोपऱ्यात लवकरात लवकर व्यापक प्रमाणावर धुरीकरण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.