नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४-२५ मधील रस्त्यांची डागडूजी करून, त्या ठिकाणच्या अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ‘खड्डेमुक्त रस्ते’ अभियानाची तातडीने अंमलबजावणी करण्याची लेखी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
अतिवृष्टीमुळे तसेच गेली साडे तीन महिने पडलेल्या संततधार पावसामुळे जुईनगर सेक्टर २४-२५ मधील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सिडकोच्या तिरंगा, भारत, जुई या गृहनिर्माण सोसायट्यांसमोर, चिंचोली तलावाजवळील परिसर, पेट्रोल पंपासभोवतालचा परिसर येथील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसराला बकालपणा प्राप्त झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे येथून वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकी वाहनचालक खड्यांमुळे घसरून पडले असल्याचे विद्या भांडेकर यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सध्या पावसाने उघडीप घेतली आहे. दिवाळीही आता २० दिवसावर आलेली आहे. जुईनगर सेक्टर २४ व २५ मधील बाह्य व अंर्तगत रस्त्याची डागडूजी करून खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने खड्डे मुक्त जुईनगर अभियान सुरू करणे आवश्यक आहे. आपण जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देवून जुईनगरवासियांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.