नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना सुविधा देण्याविषयी महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या निवेदनात अकुशलवरून कुशल कामगार पदोन्नती देणे, समान कामाला समान वेतन निकष लागू करणे, ९०० आणि १४०० या टप्प्यातील वेतनवाढीतील त्या त्या कालावधीतील थकबाकी (एरियस) तात्काळ देणेबाबत महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये ७५ कर्मचारी मुषक नियत्रंणाचे काम करत आहेत. त्यांना पालिका प्रशासनाकडून त्यांना अवघे २००२५ रुपये मासिक वेतन देण्यात येत असून कामगारांच्या हातात अवघे १६ हजार ४०० रुपये वेतन पडत आहे. सध्या वाढत्या महागाईच्या काळात घरभाडे, मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटूंबाचा खर्च सर्व भागविणे १६ हजार ४०० रूपयामध्ये त्यांना अवघड जात असल्याने यातील अधिकांश कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. महापालिका प्र्रशासनाकडून समान कामाला समान वेतनची घोषणा देण्यात येत असली तरी मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन दिल्यास त्यांचे वेतन जवळपास ३० ते ३२ हजाराच्या आसपास जाईल व त्यांच्या आर्थिक समस्याही संपुष्ठात येईल, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
मूषक नियत्रंण कर्मचारी हे कुशल कर्मचारी असतानाही त्यांचा अकुशल प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना वेतनही कमी प्राप्त होत आहे. हे कर्मचारी कुशल संवर्गात मोडत असतानाही प्रशासन त्यांचा अकुशलमध्ये का समावेश करत आहे, तेच समजत नाही. केवळ अकुशल दाखवून कमी वेतनामध्ये मूषक नियत्रंण कामगारांना राबविण्याचा उद्योग आजवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केला अससल्याचा आरोप संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून केला आहे.
मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांची यापूर्वी दोन वेळा वेतनवाढ करण्यात आलेली आहे. ९०० तसेच १४०० रुपयांची ही वेतन वाढ होती. वेतनवाढ झाल्यावर अनेक महिन्यांनी नवीन वेतन मूषक नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या हातात पडले. दरम्यानच्या कालावधीतील दोन वेळा झालेल्या वेतन वाढीतील तफावतीची रक्कम (एरियस) कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. गेली अनेक वर्षे मूषक नियत्रंण कामगारांचे ठेकेदारांनी आर्थिक शोषणच केलेले आहे. सातत्याने वेतन दोन ते तीन महिने विलंबाने करून ठेकेदारांनीच मूषकच्या कर्मचाऱ्यांना कर्जबाजारी केले आहे. विशेष म्हणजे ठेकेदार या कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करत असतानाही पालिका प्रशासनाने आजवर केवळ बघ्याचीच भूमिका घेतलेली असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना अकुशलवरून कुशल कामगार पदोन्नती देणे, समान कामाला समान वेतन निकष लागू करणे, ९०० आणि १४०० या टप्प्यातील वेतनवाढीतील त्या त्या कालावधीतील थकबाकी (एरियस) तात्काळ देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देवून मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.