नवी मुंबई : माथाडी कामगारांसाठी बाजार समिती प्रशासनाला महिन्यातून एक वेळ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याविषयी निर्देश देण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यातील कृषी क्षेत्राच्या अर्थकारणाचा कणा मानले जात आहे. या बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलच नाहीतर देशाच्या अन्य राज्यातून भाज्या व फळे तसेच धान्य विक्रीसाठी येत असते. या बाजार समितीमध्ये फळ, भाज्या, कांदा बटाटा, धान्य व किराणा दुकान अशी पाच मार्केट आहेत. येथे येणाऱ्या आवक मालावरच बाजार समिती प्रशासनाचे उत्पन्न अवलंबून आहे. या बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये येणारी आवक व स्थानिक बाजारामध्ये विक्रीसाठी जाणारा जावक मालाची चढउतार माथाडी कामगारच करत असतो. या माथाडी कामगारांच्या जिविताची काळजी घेणे हे बाजार समिती प्रशासनाचे कर्तव्य आहे. बाजार समितीचे अर्थकारणामध्ये माथाडी हा महत्त्वपूर्ण घटक असल्याने माथाडी कामगारांसाठी महिन्यातून एक वेळ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आपण पणन विभागाला पर्यायाने बाजार समिती प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.