कर्मचारी – अधिकाऱ्यांनी मानले कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार
नवी मुंबई : दिवाळी सण २२ ऑक्टोबरपासून सुरू होत असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने सन २०२१-२२ वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना २७ हजार रुपये तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना २१ हजार रुपये आणि आशा वर्कर यांना ११ हजार रुपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. सानुग्रह अनुदान जाहिर होताच पालिका कमर्चाऱ्यांनी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांचे आभार मानले आहे.
कामगार नेते रविंद्र सावंत यांनी पालिका आस्थापनेतील कर्मचारी, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान भरीव स्वरूपात मिळावे यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत सानुग्रह अनुदान अधिकाधिक मिळावे यासाठी प्रयत्नही केले होते.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पालिका आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान तसेच महापालिका परिवहन उपक्रमातील व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांना दिलेल्या निवेदनात महापालिका परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली होती.
अशा प्रकारे एकूण ४४५४ अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना दिलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला असून या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी स्वागत केले आहे.