नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंर्तगत प्रभाग ३४ मध्ये स्वच्छता विषयक कामांना गती देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५ च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबई शहरात स्वच्छ भारत मिशन अंर्तगत कामे सुरू आहेत. स्वच्छता भारत मिशनमध्ये नवी मुंबई महापालिकेचा राज्यात प्रथम व देशात तिसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे. त्याबद्दल पालिका प्रशासनाचे व सफाई कामगारांचे अभिनंदन करावे, तितके कमीच आहे. प्रभाग ३४ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६, ८ आणि १० या परिसराचा समावेश होत आहे. प्रभाग ३४ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंर्तगत तातडीने स्वच्छतेची, डागडूजीची, सौदर्यींकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे असे सुजाता पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रभाग -३४ मधील महापालिका व खासगी शाळा, चौक, उद्यान, रस्त्याच्या, गृहनिर्माण सोसायटीच्या सरंक्षक भिंतीवर सुभाषिते लिहून आकर्षक रंगरंगोटी करणे. प्रभाग -३४ मधील मैदान व उद्यानाची संपूर्ण स्वछता करून सुशोभीकरण करणे, गटर व पदपथाची सुधारणा करून रंगरंगोटी करणे, रस्त्यावरील गतीरोधकावर पुसट झालेले पट्टे रंगविणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी सर्व सोसायटी व मार्केट परिसरात कचरा डब्बे वाटप करणे अशा विविध कामांचा सुजाता पाटील यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.
नवी मुंबई स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाचेच सक्रिय योगदान आवश्यक आहे. पालिका प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. प्रभाग ३४ मधील सारसोळे व कुकशेत गावही स्वच्छ व सुंदर असावे. कोठेही बकालपणा नसावा, ही आमची भूमिका आहे. प्रभाग ३४ मधील कामे तातडीने करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.