Navimumbailive.com@gmail.com :९८२००९६५७३
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कामकाजाला गती मिळाली आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी नामदेव भगत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून दिघा ते बेलापुरदरम्यान संघटना बांधणीवर विशेष भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी गुरूवार, दि. २० ऑक्टोबर रोजी वाशीमध्ये संघटनात्मक बैठकीचे आयोजन केले आहे.
माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रभारी, माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार या संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते सांयकाळी ८.३० पर्यत वाशी सेक्टर १७ मधील पाम बीच मार्गावरील महात्मा फुले भवनातील पहिल्या मजल्यावर या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस माजी खासदार व पक्षाचे समन्वयक आनंद पराजंपे, पक्षाचे सरचिटणिस व नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, निरीक्षक आबा साळुंके, सरचिटणिस भालचंद्र नलावडे हे या संघटनात्मक बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. महिला, पुरूष, युवक, सेवादल यासह सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांशी सुंवाद साधून त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
पक्षसंघटनात्मक कार्याला गती मिळावी, पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शिलेदारांशी सुसंवाद साधून पक्षाच्या कामगिरीचा आलेख उंचवावा या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नामदेव भगत यांनी दिली.