सौ. शितल पिंगळे
मुंबई : लम्पी आजारामुळे देशातील पशूधन संकटात सापडले आहे. मागील दोन महिन्यात पशुधनावर आलेल्या लम्पी रोगाने राज्यात १० हजार जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या पालकांना ताबडतोब आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली खरी, प्रत्यक्षात मात्र हजारो शेतकऱ्यांना ही मदत मिळावी यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक जिल्ह्यांना ओल्या दुष्काळाने घेरलेले असताना घरातले पशुधनही लम्पीने दगावल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास कमालीची दिरंगाई सुरू असल्याचे आकडेवारीमुळे स्पष्ट होत आहे.
ओल्या दुष्काळाने त्रस्त शेतकरी पशूंना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाने देखील हवालदिल झाला असून राज्यात जवळपास १० हजार पशुधन या रोगाने दगावले असले तरी केवळ २ हजार २०४ पशुधनांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ७ हजार १३६ मृत पशुधन पडताळणी पूर्ण होऊनही लालफितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांवर भरपाईसाठी वाट पाहणेच नशिबी आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार एकीकडे शेतकऱ्यांचा हिताचा दावा करत राज्य कारभार चालवित असले तरी प्रशासनाकडून लम्पीग्रस्तांना मदत मिळण्यात लेटलतिफ कारभाराचा फटका बसल्याने शिंदे-फडणवीस सरकारबाबत शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर आळविला जात आहेे.
राज्यात ९ हजार ८४२ पशुधन लम्पी चर्मरोगाने दगावले आहेत. त्यापैकी ७ हजार १३६ जनावरांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केवळ २ हजार ७२३ जनावरांची पडताळणी केली. जवळपास ५ हजारांपेक्षा अधिक जनावरांची अद्याप पडताळणी केलेली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ९६ हजार ८६२ गाई आणि बैल याना लम्पी आजाराची लागण झाली आहे. तर सर्वाधिक मृत्यू बुलडाणा जिल्ह्यात १,१३० नोंदले गेले आहेत.
पशुधनाचे नुकसान व भरपाई
मृत पशुधनाची संख्या : ९ हजार ८४२
पडताळणी पूर्ण : ७ हजार १३६
नुकसान भरपाईसाठी सादर प्रस्ताव : ३ हजार ६९४
समितीने मंजूर केलेल्या पशुधनाची संख्या : २ हजार ७२३
नुकसान भरपाई अदा केलेले पशुधन : २ हजार २०४
एकूण अदा रक्कम : ५ कोटी ६२ लाख १५ हजार