नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला बकालपणा आणणाऱ्या व पालिकेचे उत्पन्न बडविणाऱ्या अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अंर्तगत व बाह्य भागातील बॅनर तातडीने काढून नेरूळ पश्चिमचे सौंदर्यीकरणाला हातभार लावण्याची लेखी मागणी कामगार नेते संदीप खांडगेपाटील यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली असून संबंधित निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.
अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांमुळे परिसराला बकालपणा येत असतो. पालिकेच्या उत्पन्नातही घट येते, विकासकामांना निधी अपुरा पडतो. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. नेरूळ महापालिका विभाग कार्यालयांर्तगत नेरूळ पश्चिमेला अंर्तगत व बाह्य भागातील रस्त्यांवर, चौकांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसर, राजीव गांधी उड्डाणपुल दोन्ही बाजू, सारसोळे बसडेपो चौक, मुख्य रस्ते व अन्य भागात बाराही महिने अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणावर लागलेले असतात. यामुळे नेरूळ पश्चिमला बाराही महिने बकालपणा असतो. शहर स्वच्छता अभियानातून नेरूळ पश्चिम परिसर वगळला आहे काय? अनधिकृत बॅनर लावणारे पालिका प्रशासनाचे जावई आहेत काय? त्यामुळेच अतिक्रमण विभाग अनधिकृत बॅनरवर कारवाई कधीच केली जात नाही व संबंधितांवर फौजदारी गुन्हे का प्रशासन दाखल करत नाहीत?, अशी विचारणा संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ पश्चिम परिसरातील वाढता बकालपणा व पालिकेचा बुडणारा महसूल पाहता लवकरात लवकर नेरूळ पश्चिम परिसरातील अंर्तगत व बाह्य भागातील अनधिकृत बॅनर तातडीने काढण्याचे व सातत्याने नियमितपणे अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.