विठ्ठल ममताबादे
उरण : उरणच्या बालई काळाधोंडा या विभागातील जमिनींचे भूसंपादन हे बेकायदेशीर असून सिडकोच्या या भू संपादनाच्या विरोधात आत्ता येथील स्थानिक भूमिपुत्रांनी दंड थोपटले आहे. बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या वतीने प्रकल्प ग्रस्थांचे नेते राजाराम पाटील यांनी रायगड उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा भूसंपादन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे सिडको विरोधात निवेदन (तक्रार अर्ज) सादर केले आहे.
सिडको १९७३ च्या कालबाह्य शासन राजपत्रातील नोटिफिकेशन द्वारे उरणच्या जमिनीचे भूसंपादन करीत आहे.ही शेतकऱ्यांची थेट फसवणूक आहे. उरण येथील जमिनीवर नैसर्गिक लोकसंख्येनुसार वाढलेली विस्तारीत गावठाणात हजारो घरे आहेत. १९५० पासून नेव्ही ओनजीसी जेएनपीटी, एमएसीबी, सिडको,सेझ यांचे भूसंपादन झाले आहे.आता जमीन शिल्लक नाही. सर्व जमिनीवर मूळ उरणकर आगरी कोळी कराडी माळी चर्मकार बौद्ध मातंग आदिवासी बारा बलुतेदार अल्पसंख्याक मुस्लिम ईस्ट इंडियन ख्रिश्चन आणि इतर भारतातून आलेल्या केंद्रीय कर्मचारी वर्गाची स्वतंत्र बंगले आणि टुमदार घरे आहेत.सिडकोने अगोदर घरांसाठी घेतलेल्या मौल्यवान जागा रिलायन्स अंबानी सेझ प्रकल्पासाठी विकल्याने सिडको जमिनीसाठी दिवाळखोर झाली आहे. नवी मुंबई अदानी विमानतळ या खाजगी प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींचे पुनर्वसन करण्यासाठी सिडकोकडे जमीन शिल्लक नाही.आज सुरू आहे ती फसवणूक म्हणूनच मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे.१८९४ चा कायदा रद्द होऊन भूसंपादन कायदा २०१३ केंद्र सरकारने आणला.याबाबत स्थानिक आमदार खासदार प्रशासन राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रबोधित का करीत नाही ? सारे शेतकऱ्यांची लुबाडणूक का करीत आहेत.या कायद्यानुसार जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्या अगोदर येथे प्रकल्प बाधित लोकांचा सामाजिक आघात परिणाम सर्व्हे मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी करणे कायद्याने बंधनकारक आहे.यामुळे अनेक टपरी कोंबडी चिकन सेंटर दुकाने, शेतकरी मच्छीमार व्यावसायिक यांचे पुनर्वसन होऊ शकते.हे डावलून साडे बावीस टक्के सहमती पत्राने घोर फसवणूक झाली आहे. विस्तारीत गावठाणात असलेली हजारो घरे एम आर टीपी कायद्याने तोडण्याचे अधिकार सिडकोस मिळणार आहेत. यातील भयानकता नवी मुबंई विमानतळातील १० गावांच्या उधवस्तीकर प्रकरणात नवी मुबंई विमानतळ निर्माण करताना लोकांनी पाहिले आहे.असे राजाराम पाटील यांनी आपल्या निवेदनात(तक्रार अर्जात ) म्हटले आहे. उरण परिसरातील निसर्ग सौदर्याने नटलेली २५०० वर्षांपूर्वीची सर्वधर्मीय वस्ती हे संविधानिक भारताचे आधुनिक रूप आहे. येथील बौद्ध लेणी, पिरवाडी दर्गा, जुने चर्च, पुरातन हिंदू मंदिरे वाचविण्यासाठी सिडको हटाव उरण बचाव हे ब्रीदवाक्य घेऊन लोकनेते दि. बा. पाटील खोती विरोधी आडोळणाचे जनायक नारायण नागु पाटील आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरचे विचार आणि उरणच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या आरमारी इतिहासातील मावळे आगरी कोळी भंडारी कराडी इर्षेने या लढ्यात उतरले आहेत.