राजकारण हे अलीकडे सर्वात मोठे सार्वजनिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. शेती आणि शेतकऱ्यांसारखेच हे क्षेत्रही बेभरवशाचे समजले जाते. शेतकऱ्याच्या पुढे ऐन हंगामात कोणते संकट वाढून ठेवलेले असेल हे सांगता येत नाही तसेच राजकारणाचे असते. प्रचंड अस्थिरता आणि ताण तणाव सतत सभोवताली असताना चेहऱ्यावर उसने हास्य आणीत राजकारण करणे सोपे नाही म्हणूनच कदाचित राजकीय लोकांना लक, नशीब आणि राजयोग या शब्दांवर विशेष प्रेम असते. निवडणुकीत कोणाचे काय चुकले ? हे तपासत बसण्यापेक्षा आपल्या नशिबात राजयोग नव्हता या वाक्यावर समाधान मानणारे नेते मोठ्या संख्येने आहेत. शरद पवार , कपिल पाटील अशी नशिबाला फाट्यावर मारणारी नावे राजकारणात दुर्मिळ झाली आहेत. योगायोग आणि परिस्थितीजन्य यश पदरात ज्यांच्या पडते अशा लोकांचा नशिबावरचा विश्वास अचानक वाढत जातो.
कोणत्याही निवडणुकीत यशापर्यंत हात पोहोचतात, अनेकजण तर विजयी मिरवणुका पण काढतात. नंतर मात्र वास्तव पुढे येते की बोटांवर मोजता येईल एवढ्या मतांनी भाऊंचा पराभव झाला. अशावेळी कुणीतरी जवळची व्यक्ती सांत्वनपर शब्द काढते ते असतात. आपल्या नशिबातच राजयोग नव्हता. मग हा राजयोग येण्यासाठी नेत्यांची धडपड सुरु होते. सत्तेसाठी आतुर असलेल्या अशा नेत्यांची देहबोली ओळखणारे भवताल असतातच . हातातोंडाशी आलेला घास हिसकावले जाण्याचे दुःख काय असते हे ज्याला माहित असते तो नेता मग हा राजयोग आपल्या हातांच्या , कपाळावरच्या रेषांवर शोधायला सुरुवात करतो. त्याला अशी असंख्य उदाहरणे ऐकवली जातात की अमुक मतदार संघात तमुक व्यक्ती ऐन वेळेवर उमेदवार म्हणून जाहीर झाला आणि अवघ्या महिनाभरात विजयी झाला. अमुक आमदार निवडून आला अन लगेच मंत्रीही झाला.
अभ्यास, नियोजन आणि कर्तृत्व यावरचा भरवसा ठिसूळ झाला की नशीब, लक ,राजयोग आणि त्यासाठी करावयाचे सगळे विधी , कर्मकांडे जवळची वाटायला लागतात, सध्याच्या राजकारणातील जवळपास सगळ्याच पक्षातील नेत्यांचा नशिबावर विश्वास आहे. त्यासाठी ते फलज्योतिष्यही बघत असतात. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवा करून बघितला. शिर्डीच्या दौऱ्यावरून परत येत असताना ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील महादेव मंदिरात दर्शनाला गेले. परतीच्या प्रवासात खरंतर याचा कुठेही उल्लेख नव्हता. मिरगावला कॅप्टन अशोककुमार खरात नावाचे एक अलीकडे उदयास आलेले ज्योतिषी आहेत. अनेक राजकीय नेते त्यांच्याकडे येऊन हात दाखवून जातात. राजकीय नेत्यांचा जिथे कुठे वावर असतो, त्याची लवकर प्रसिद्धी होते याचा सगळ्यांना अनुभव आहेच. शिंदेनी खरंतर हा दौरा गोपनीय ठेवण्याचे काहीही कारण नव्हते. आपल्या देशात सध्यातरी ज्योतिष्याला हात दाखवणे किंवा कर्मकांड करणे हा गुन्हा नाही.
आजच्या काळात काहीही गोपनीय राहू शकत नाही. बातम्या बाहेर येतातच. तशी ही बातमीही बाहेर आली. शरद पवार यांनी त्यावर टीका करताना कर्तृत्व कमी पडायला लागले की माणूस नशिबाला शरण जातो असे विधान केले ते शंभर टक्के सत्य म्हणावे लागेल. ज्या राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतो आणि उद्या तुमच्या जीवनात काय घडेल हे सांगण्याला आव्हान दिलेले असते अशा राज्याचा मुख्यमंत्री राजरोसपणे कुणालाही हात दाखवत फिरत असेल, नवस फेडण्याचे इव्हेन्ट करीत असेल तर पुरोगामी राज्याचा नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची मान आपसूकच खाली जायला लागते. श्रद्धा, भक्तिभाव किंवा धार्मिक उपासना स्वातंत्र्याचा हा सुंदर दुरुपयोग म्हटला पाहिजे. मुख्यमंत्री हातांवरील रेषांत भविष्य शोधत असतात त्याच दरम्यान पुणे विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरु केल्याची बातमी सगळ्यांचा कानावर येणे हा भयंकर योगायोग इथेच घडू शकतो.
मुळात जगातल्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात पुढे काय घडणार आहे हे अजिबात लिहिलेले नसते. थोडक्यात नशीब, दैव, प्रारब्ध, लक ही शुद्ध फोकनाड आहे. जगभर त्यावर अभ्यास, संशोधने झाली आहेत. त्यातून हाती काहीच सापडले नाही. लोक नेहमी खगोलशास्त्र आणि ज्योतिष यात गोंधळ करीत असतात. दिवस, रात्र , ग्रहण, भरती ओहोटी किंवा ग्रहगोल ताऱ्यांचा अभ्यास करणारे खगोलशास्त्र हे वैज्ञानिक आहे. कुंडल्या ,पत्रिका, हात आणि कपाळावरील रेषा बघून भविष्य सांगणे याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जगातील १८६ शास्त्रज्ञानी सत्तरच्या दशकात एक संयुक्त पत्रक काढून फलज्योतिष्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन केले आहे. यात दोन नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञाचा समावेश आहे. ठोकताळे आणि कुणालाही फिट बसतील, आवडतील अशी ठराविक वाक्ये फेकून लोकांची दिशाभूल करणे हे एकमेव काम ज्योतिष्यानी सुरु केले आहे. अशा अवैज्ञानिक बाबीवर संवैधानिक पदावर आरूढ व्यक्तीने भरवसा ठेवणे आणि त्यासाठी शासकीय लवाजमा वापरणे सर्वथा गैर आहे.
भाजप किंवा सगळे हिंदुत्ववादी ज्या स्वामी विवेकानंदाना मानतात ते नेहमी म्हणत असत की नशीब हे हातांच्या रेषांवर नसून कर्तृत्व करणाऱ्यांच्या मनगटात असते , ते आपल्या प्रवचनात नेहमी राजा आणि प्रधान यांची गोष्ट सांगत असत. ती गोष्ट कुणीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकण्याची गरज आहे तरच त्यांचे कर्तृत्व की कुंडली हे धर्मसंकट टळू शकेल .
-पुरुषोत्तम आवारे पाटील