मुंबई : राज्यात गोवरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात तर गोवर संसर्ग पोहोचलाच आहे मात्र, आता गावामध्येही गोवर संसर्ग झालेले रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात चिंता वाढू लागली आहे. आज गोवरचा उद्रेक ९६ पटींनी वाढला आहे. तर, १२ हजार ८४१ संशयित रूग्ण आढळले आहे.
मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच २०२२ या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. २०१९ मध्ये गोवरचा उद्रेक तीन पटींनी झाला होता. तर, २०२० मध्ये गोवरचा उद्रेक दोन पटींवर होता. २०२१ मध्ये तर गोवर बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजेच एक पटींनी वाढली होती. २०२२ मध्ये गोवर आजाराने कहरच केला आहे. ही संख्या आता ९६ पटींनी वाढली आहे.
आज ८२३ गोवरबाधित रूग्णांचे निदान करण्यात आले आहे. तर, तब्बल १२,८४१ संशयित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गोवरमुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या १८ आहे. यामध्ये १२ मुंबईत, ३ भिवंडी, २ ठाणे मनपा, १ वसई विरार मधील रूग्ण होते. राज्यात गोवरची संख्या आठशेच्या पार पोहोचली आहे. त्यामुळे चिंता फारच वाढली आहे.
- गोवर संसर्गाची लक्षणे कोणती?
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुले दगावण्याची सुद्धा भीती असते.