प्रजेच्या पायात काटा जरी रुतला तरी राजाच्या डोळ्यातून टचकन पाणी यायला हवे असे वातावरण जिथे असते त्याला प्रजाभिमुख कारभार म्हटला जातो मात्र आताचे लोकशाहीतून उदयाला आलॆले राजे किती कोडगे असू शकतात याची उदाहरणे दररोज बघायला मिळतात. रोम जळत होते तेव्हा तिथला राजा फिडल वाजवत होता हे आजवर आपण फक्त ऐकून होतो. काल त्याचे आधुनिक स्वरूप बघायला मिळाले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे घरकुल पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेला बेघर व्यक्ती थंडीने कुडकुडत मेला मात्र समुद्धी मार्गावर शानदार सैर करणाऱ्या राजाला घरासाठी जीव देणाऱ्या प्रजेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.
लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असते याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच, उरलेले हप्ते मिळावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, कारवाईची मागणी होत आहे.आप्पाराव भुजाराव पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आप्पाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहे. पवार हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.
शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी पवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते. मात्र त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे थंडीत कुडकुडत उपोषणाला बसलेले आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अप्पा पवार हा व्यक्ती आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसला. त्याआधी त्याने सरकार दरबारी जे निवेदन आणि कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचे जे सोपस्कार पार पाडायचे असतात. ते सगळे उरकले मात्र सरकारी कातडीला त्याच्या प्रश्नाकडे बघायला वेळ नव्हता. सामान्य माणसाला गांधींनी या देशात शेवटचे प्रभावी अस्त्र देऊन ठेवले त्याचा मोठा आधार आजवर त्याला वाटत आला आहे.
सामान्य माणसाच्या आवाक्यात असलेले सगळे प्रयत्न करून झाल्यावर उपोषण किंवा आत्मदहन असे टोकाचे दोनच मार्ग त्याच्याकडे बाकी असतात. त्यापैकी कुठलातरी मार्ग हा व्यवस्थेने पिचून काढलेला व्यक्ती निवडत असतो. मात्र नोकरशाही आणि प्रशासन एवढे निष्ठुर बनले आहे की माणसाच्या मरणाचे त्यांना कोणतेही सोयरसुतक वाटत नाही. उपद्रवशून्य जनता नेहमी त्यांच्या पायाखाली तुडवली जाते. बीडची भयावह घटना त्याचेच प्रतीक मानली पाहिजे. मतांवर किंवा खुर्चीवर जो कोणताही परिणाम घडवू शकत नाही अशा घटकाला काडीचीही किंमत शासन,प्रशासन देत नसते , त्याचा अतिरेक झाल्यावर विचार करणारी जनता नक्षलवादाकडे वळत असते.
बीडचे जिल्हाधिकारी राधामोहन शर्मा या अमराठी माणसाचा त्यात दोष नाही. इथला सामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणूस पाय घासून घासून मेला तरी त्यांच्या लाखोंच्या पगारात कवडीचीही कमतरता भासत नाही की मराठी नेत्यांची त्यांच्यापुढे हुजरेगिरी कमी पडत नाही. आपल्या येण्याजाण्याच्या रस्त्यात कुणीतरी गरिबाने मांडव टाकला आहे हे दररोज पाहताना ज्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही असे ” राधा मोहन ” दुर्दैवाने आपल्या प्रशासनात पदोपदी आपण भरून ठेवले आहेत. आमदार,खासदार किंवा पालकमंत्र्यांना पदावरकोणता गाढव बसला आहे याचे कोणतेही देणेघेणे नसते ,एका फोनवर स्वतःचे काम झाले की अशाना नेपाळी बहादूर सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून चालतो.
दोनतीन दिवसांच्या उपोषणात आजवर कुणावर मरणाला कवटाळण्याच्या प्रसंग आला नाही मात्र उपासमारी ज्यांच्या जगण्यात पेरलेली असेल अशाना तीन दिवस काढणे कठीण असते. आप्पा पवार या बेघर माणसाला मरणाच्या दारात ढकलणाऱ्या जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. बीड हा अत्यंत्य जागृत मराठ्यांचा जिल्हा आहे दुर्दैवाने हा मरणारा पवार मराठा नाही म्हणून सगळे मराठे शांत आहेत. माणूस मेल्याचे कुणालाही दुःख नाही. फक्त शिवशक्ती व भीमशक्तीला कुणी हात लावता कामा नये माणूस मेला तरी चालेल. घरासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आप्पा पवारच्या पाठीशी उभे राहून एखादेही मत मिळत नसेल तर आमदार,खासदार किंवा त्या भागातल्या जिल्हा परिषद सदस्याने का असल्या फालतू भानगडीत पडावे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत की त्यांनी थेट अधिकाऱ्याला फोन केला आणि यंत्रणा जागे झाली. मग एखादा फोन या आप्पा पवारच्या घरकुलासाठी करावा असे त्यांना का वाटले नाही. उपोषण करताना एखाद्या कष्टकरी माणसाचा मृत्यू व्हावा हा शिंदे- फडणवीस यांच्या कार्यकालावर लागलेले मोठा डाग आहे. ज्या दिवशी हे दोघे बीडच्या काही तासांच्या अंतरावर समृद्धी मार्गाची पाहणी करीत होते त्याचवेळी हा गरीब माणूस जगण्या मरणाचा शेवटचा संघर्ष करीत होता. हे प्रशासनावर पकड असल्याचे लक्षण नक्कीच नाही उलट तो असंवेदनशीलतेचा कळस म्हणून राज्याच्या इतिहासात नोंदवला जाईल.
– पुरुषोत्तम आवारे पाटील