आपल्या देशामध्ये राजकारण आणि क्रिकेट हे दोन असे विषय असे आहेत की, या विषयामध्ये फारशी माहिती नसणारे घटकही अनेक मिनिटेच काय, पण काही तासही प्रगाढ ज्ञान असल्यासारखे बोलत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व हातवारे पाहिले की त्यांच्याशिवाय अन्य कोणाला इतकी विस्तृत माहितीच नसावी, असा प्रथमदर्शनी भास व्हावा. क्रिकेट हा जसा बेभरवशाचा खेळ आहे, तसाच राजकारण हा प्रकारही बेभरवशाचा खेळ मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश भारताचा क्रिकेटमध्ये दणदणीत पराभव करेल, असे कोणी भाकीत वर्तविले असते तर कोणीही सहजासहजी विश्वास ठेवला नसता, पण तोच बांगलादेश दणदणीतरित्या भारताचा पराभव करत आहे. वर्षभरापूर्वी ठाण्याचे एकनाथ शिंदे शिवसेनेला खिंडार पाडून स्वत: मुख्यमंत्री बनतील असे सांगितले असते तर कोणीही त्याला मूर्खात काढले असते. राजकारण आणि क्रिकेट हा बेभरवशाचा प्रकार असल्याचा पावलापावलावर प्रत्यय येतच असतो. नवी मुंबईच्या राजकारणातही सध्या तोच प्रकार सुरु आहे. इथे आज कोण कोणाचा आहे, काल कोण कोणाचा होता आणि उद्या कोण कोणाचा असेल याचा कोणालाही ठामपणे अंदाज बांधता येणार नाही. नवी मुंबईच्या राजकारणाची पूर्णपणे खिचडी झाली आहे. नवी मुंबईत आपल्याच पक्षाला व आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, पक्षाच्या लोकप्रतिनिधींना संपविण्याचे काम आपल्याच पक्षातील लोक करत असल्याची नाराजी त्या त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपसातील चर्चेदरम्यान व्यक्त करु लागले आहेत. एकाच शब्दांमध्ये नवी मुंबईच्या राजकारणाचे वर्णन करावयाचे झाल्यास ‘नवी मुंबईच्या राजकारणाची खिचडी होऊ लागली आहे ’ एवढेच म्हणणे योग्य ठरेल.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सरकारी रुग्णालय व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन मंजुर करुन आणले. सिडकोने भुखंड निश्चित केला, महापालिकेने पैशाचा भरणा केल्यावर तो भुखंड उपलब्ध होणार. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच कोणाच्या तरी पोटामध्ये पोटदुखी सुरु झाली. जनसामान्यांमध्ये आमदार मंदा म्हात्रेंची सरकारी रुग्णालय व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामुळे प्रतिमा चांगली होणार, नवी मुंबईत जनाधार त्यांच्यामागे उभा राहणार आणि नेमके हेच होऊ नये यासाठी हे होऊ नये म्हणून मंदाताई म्हात्रे यांनी सुरू केलेल्या कार्यामध्ये ‘कुल मांईडेड’ घटकांने डोक्याचा वापर करत अडथळे आणण्यास सुरुवात केली. परंतु यात आमदार मंदाताई म्हात्रे यांचे काहीच नुकसान झाले नाही. उलट त्यांच्याप्रती नवी मुंबईकरांमध्ये सहानूभूती वाढीस लागली. मंदाताईंनी पाठपुरावा करुन आणलेल्या गोष्टींमध्ये अडथळे कोण आणतेय, याचीच चर्चा नवी मुंबईकरांमध्ये सुरु असून मंदाताईंच्या मागे जनसामान्यांमध्ये असलेला जनाधाराचा टीआरपी मात्र कमालीचा वाढीस लागला आहे. मात्र या राजकीय कलगीतुऱ्यात नवी मुंबईतील मैदानावर ठराविक घटकांनी खेळपट्टी बनवून त्याची केली जाणारी भाडे आकारणी व खेळपट्टीच्या माध्यमातून आक्रमण करत पालिकेच्या मैदानावर मालकी हक्क प्रस्थापित करत त्याचा खुलेआमपणे केला जाणारा व्यावसायिक वापर उघडकीस आला. आजवर पालिकेच्या मैदानावर ठराविक घटकांचे अतिक्रमण व मालकी हक्क आणि इतर समाजाच्या घटकांना खेळताना तसेच क्रिडा स्पर्धा आयोजनातील अडथळे यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पालिकेच्या मैदानाची डागडूजी पालिकेच्या तिजोरीतून म्हणजेच करदात्या सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या खिशातून होत असताना ठराविक घटकांचे मैदानावरील मालकीहक्क आणि त्या घटकाचे समाजबांधव असणाऱ्या स्थानिक भागातील लोकप्रतिनिधींचा त्या प्रकाराकडे आजवर झालेला कानाडोळा या गोष्टींची मंदाताई म्हात्रे –रुग्णालय-वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणातून नवी मुंबईकरांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अशोक गावडे एकेकाळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांचे कट्टर समर्थक, ज्यांनी पडझडीच्या काळात राष्ट्रवादीची धुरा सांभाळली, विधानसभा लढविली, त्याच अशोक गावडेंवर राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडायची वेळ आली. अशोक गावडेंनी राष्ट्रवादी सोडली का त्यांना स्थानिक पातळीवरील घडामोडींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्यास भाग पाडले, ही गोष्ट आता लपून राहीलेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळचे माजी तालुकाध्यक्ष महादेव पवार हा नेरूळ पश्चिमच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नावाजलेला मोहरा. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हमखास तिकिट मानले जाणारा व निवडणूकीत प्रस्थापितांना घाम फोडण्याची क्षमता असणाऱ्या महादेव पवारांना आज पदावरुन बाहेर ठेवण्यात आले आहे. सातत्याने काम करुनही पदावरून काढल्याने अपराध माझा काय घडला, हे असे विचारण्याची वेळ महादेव पवारांवर आली आहे. शशिकांत शिंदेपासून जितेंद्र आव्हाडांच्या दरबारात अगदी जयंत पाटलांच्या कानापर्यत हा विषय गेला आहे. त्यामुळे राजकारणात काम करताना घरचे किती जाळायचे हा धडा महादेव पवारांना या प्रकरणातून निश्चितच मिळाला असणार.
ऐरोलीचे ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा असणारे ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी यांना तडीपारीचा सामना करावा लागला आहे. ऐरोली, दिघा परिसरात अधिकाधिक लोकप्रतिनिधी व राजकीय घटक ‘सालस, सज्जन, स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक’ असताना एकट्या एम.के.मढवींनाच वनवास का भोगावा लागत आहे, या प्रश्नांचे उत्तर नवी मुंबईकरांनाही माहिती आहे. ऐरोली-दिघा भागातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण तसेच गुन्हेगारीचे राजकीय पुनर्वसन या गोष्टी गेल्या काही दशकांपासून सुरू आहेत. ऐरोली दिघा नोडमध्येच नाही नवी मुंबईच्या कानकोपऱ्यात गुन्हेगार राजकारणाचा बुरखा पांघरुन गल्ली बोळात फिरत आहे. राजकारणातील वाल्या कोळी वाल्मिकीचे रूप घेवून कृत्य मात्र वाल्यांचेच करत आहे. जनताही राजकारणातील गुन्हेगारांसमोर कच खात असल्याने हेच राजकारणातील गुन्हेगार आपला प्रभाव वाढवत चालले आहे आणि नेमके याचमुळे नवी मुंबईच्या राजकारणात गुन्हेगारी फोफावली आहे. अनेक राजकीय घटकांवर गुन्हे दाखल असताना, त्यांनी तुरूंगवारी केलेली असतानाही एकट्या ‘मनोहर’वरच अन्याय कशासाठी असा टाहो ऐरोली विधानसभेतील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून फोडला जात आहे. केवळ ठाकरे गटांशी निष्ठा दाखविल्याची किंमत आज एम.के.मढवींना मोजावी लागली आहे.
महिला वर्गाच्या बाबतीत अधिकाधिक राजकीय घटकांची प्रतिमा मलीन असल्याने उडदामाजी काळेगोरे निवडण्याचा प्रकार नवी मुंबईत पहावयास मिळत नाही आणि मिळणारही नाही. सर्वच मातब्बरांवर महिला प्रकरणी आरोप असल्याने व न्यायालयात खटले दाखल असल्याने याप्रकरणी कोणीही कोणावर चिखलफेक करत नाही. महापालिका जिंकण्यासाठी महाविकास आघाडी व भाजप यांच्यात निकराची झुंज असताना शिवसेना फुटीमुळे महाविकास आघाडी काही प्रमाणात बॅक फूटवर गेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस दोन आकडी संख्याबळ गाठण्याची शक्यता कमीच आहे. ठाकरे गट हा त्यातुलनेत प्रभावी असून २५ ते ३० चा आकडा ओंलाडणे ठाकरे गटाला निवडणूका कधीही झाल्या तरी शक्य आहे. भाजप स्वबळावर सत्तेत येण्याची शक्यता असून काही जागा कमी पडल्यास त्यास शिंदे गटाचा टेकू लाभण्याची दाट शक्यता असल्याने राज्याप्रमाणे नवी मुंबईतील सत्ता संपादनात भाजप व शिंदे गटाचा मनोमिलाफ होण्याची शक्यता आहे. दोन आमदार व जवळपास ६० ते ७० माजी नगरसेवक तसेच शेकडोंच्या संख्येत मातब्बर पदाधिकारी असणाऱ्या वाशीतील भाजप कार्यालयाच्या कामाला मुहूर्त कधी भेटणार व ते कधी पूर्ण होणार हा प्रश्न सीमाप्रश्नाप्रमाणे तसेच काश्मिर प्रश्नांप्रमाणे भिजत घोंगडे बनला आहे. घणसोली कॉलनीमध्ये राष्ट्रवादीचे हमखास खाते उघडून देण्याची क्षमता असणारे चर्चेतील चेहरे शिंदे गटात जाणार असल्याची स्थानिक भागात जोरदार चर्चा असल्याने माथाडींची निष्ठा व श्रध्दा शरद पवारांकडेच राहणार का विभागली जाणार, हेही पालिका निवडणूकीत स्पष्ट होणार आहे. भाजपमधील ऐरोली व बेलापुर या दोन्ही मतदारसंघातील मातब्बरांमध्ये असलेला स्नेह पक्षसंघटनेला हानीकारक ठरत असून त्याची पालिका निवडणूकीत भाजपला ‘जबरी’ किंमत मोजावी लागणार असल्याची भीती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. खाडीपलिकडे नाही तर नागपूरच्या रेशमबागेतही काही चाणक्यांनी याची माहिती पुरविण्याचे चोख काम करत आपली पक्षनिष्ठा सिध्द केली आहे. तुर्तास अल्पविराम.
अबोली पाटील – वाशी