नवी मुंबई : सारसोळे गावातील महापालिका शाळा क्रं १२, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या प्राथमिक शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक तात्काळ उपलब्ध करुन देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून महापालिका शाळेच्या माध्यमातून मुलांना दिले जाणारे शिक्षण खरोखरीच चांगल्या दर्जांचे आहे. खासगी मराठी शाळा बंद पडत असताना महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी टक्का वाढणे ही महापालिका प्रशासनासाठी तसेच नवी मुंबईकरांसाठी भुषणावह बाब आहे. तथापि सारसोळे गावातील महापालिकेची शाळा क्रं १२ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या प्राथमिक शाळेला गेली ६ वर्षे स्थायी स्वरूपात मुख्याध्यापक नसून या जागेवर हंगामी स्वरूपातील मुख्याध्यापक नेमून शाळेचा कारभार चालविला जात आहे. ६ वर्षे शाळेला मुख्याध्यापक नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून महापालिका सारसोळे शाळेला कायमस्वरुपी मुख्याध्यापक उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.