संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbaiive.com@gmail.com -९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना आरोग्यविषयक सतर्कतेचे मार्गदर्शन करणेबाबत तसेच दिघा ते बेलापुरदरम्यान जनजागृती अभियान राबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीच्या दोन लाटांचा नवी मुंबईकरांनी यशस्वीपणे सामना केलेला आहे. पालिका प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबईकरांसाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. प्रशासनाच्या जोडीला राजकीय तसेच सामाजिक घटकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी नि:स्वार्थीपणे बजावलेली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाने स्वत:च्या व स्वत:च्या परिवाराची काळजी न करता जीव धोक्यात घालून नवी मुंबईकरांची प्रामाणिकपणे सेवा बजावलेली आहे. आता पुन्हा शेजारील देशांमध्ये कोरोना महामारीचा स्फोट झाला असून आपल्या देशामध्ये त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा नवी मुंबईत उद्रेक वाढण्यापूर्वीच नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सतर्क होवून नवी मुंबईकरांनाही कोरोना महामारीबाबत सावध करणे गरजेचे असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागाने पुन्हा येण्याची दाट शक्यता असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे. गरम पाण्याची वाफ, मास्क यासह गर्दीत जाणे टाळावे यासह ज्या ज्या खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्याबाबत घरटी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरी आरोग्य केंद्राची यंत्रणा राबवावी. सोसायटींमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन पत्र देवून सोसायटीच्या सदस्यांना माहिती देण्यास सांगावे. याशिवाय कोरोना महामारीविषयक नियमावली नवी मुंबईकरांना अवगत करून द्यावी. ज्यांनी कोव्हिड लसचा एकही डोस घेतला नसेल त्यांच्यासाठी विशेष अभियान राबवावे, अजूनही शालेय बालके लसीकरणापासून वंचित आहेत. शालेय मुलांसाठी माताबाल रुग्णालयांमध्ये आठ दिवसीय शिबीर तातडीने राबवावे. शंभर टक्के लसीकरणासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत. कोरोना महामारीच्या संभाव्य संकटाचा प्रशासन व नवी मुंबईकरांनी एकत्रित सामना करावयाचा असल्याने लवकरात लवकर पालिका प्रशासनातील संबंधित यंत्रणांना योग्य ते निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.