नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून जुईनगर-नेरूळ नोडमध्ये दूषित पाण्याच्या समस्येने रहीवाशी त्रस्त झाले होते. याबाबत स्थानिक रहीवाशांनी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्याकडे तक्रारी केल्यावर भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे जलकुंभापासून ते थेट जलवाहिन्यांपर्यत सर्वच पातळीवर पालिका प्रशासनाने काम करत दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण केले. दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण केल्यामुळे विद्या भांडेकर यांनी पालिका प्रशासनाचे व या समस्येला प्रसिद्धी देवून समस्या प्रकाशझोतात आणण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांचेही विद्या भांडेकर यांनी आभार मानले आहे.
जुईनगर-नेरूळ नोडमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे रहीवाशी विशेषत: लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. पोटात दुखणे, उलट्या, जुलाब होणे आदी आजारांनी घरोघरी रुग्ण दिसू लागले होते. भांडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केल्याने आरोग्य विभागाला जाग आली. त्यांनी स्थानिक भागात डॉक्टरांचे पथक पाठवून रहीवाशांची तपासणी करुन उपचार केले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलकुंभ ते गृहनिर्माण सोसायट्यांपर्यत जलवाहिन्यांची पाहणी केली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्या भांडेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत जलकुंभाची त्यांना पाहणी करून दाखविली. ज्या ठिकाणी जलवाहिन्यांची समस्या होती, त्या ठिकाणी पालिका प्रशासनाने जलवाहिन्या बदली केल्या. दूषित पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी विद्या भांडेकर करत असलेल्या पाठपुराव्याची प्रसिध्दी माध्यमांनी दखल घेत त्यास प्रसिध्दी दिली. परिणामी दूषित पाण्याची समस्या प्रकाशझोतात आली. पालिका प्रशासन व प्रसिध्दी माध्यमांनी केलेल्या सहकार्यामुळे दूषित पाण्याच्या समस्येचे तुर्तास निवारण झाल्याने विद्या भांडेकर यांनी संबंधितांचे आभार मानले आहे. विद्या भांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे दुषित पाण्याच्या समस्येचे निवारण झाल्याने स्थानिक रहीवाशांनी विद्या भांडेकर यांच्या पाठपुराव्याची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले.