अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझेशन तसेच नियमित फवारणी करण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहराने यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने व अथक प्रयासाने दोन वेळा कोरोना महामारीचा सामना केलेला आहे. सध्या पुन्हा एकदा कोरोना महामारीचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तशी भीती नवी मुंबईकरांच्या चर्चेमधून व्यक्त केली जात आहे. चीनसह अन्य देशात कोरोनाचा उद्रेक पाहता व अजूनही विमानसेवा सुरू असल्याने कोरोना महामारीचा नवी मुंबई शहरामध्ये पुन्हा प्रभावी शिरकाव करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई शहरातील स्मशानांमध्ये मृतदेहांसोबत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातलग, मित्र, परिचतांकडून कोरोना महामारीचे पालन केले जात नाही. अनेकदा गर्दीमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये पालिका प्रशासनाने दररोज सॅनिटायझेशनची फवारणी दिवसातून तीन ते चार वेळा करावी. स्मशानभूमी येणाऱ्यांसाठी सॅनिटायझेशन उपलब्ध करून द्यावे. तसेच स्मशानभूमीत येताना मास्कचा वापर करावा तसेच कोरोनाविषयक मार्गदर्शनपर सूचनांचा फलक प्रत्येक स्मशानभूमीत प्रवेशद्वाराच्या बाजूलाच बसविण्यात यावा. यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.