अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा येथील ओरिएण्टल कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर तसेच सानपाडा स्टेशन परिसरात व मोकळ्या जागी चालणारे अश्लिल चाळे, भांडणे, गोंधळ, मारामाऱ्या यामुळे सानपाडावासिय त्रस्त झाले असल्याने याविरोधात भाजपाचे सानपाडा नोडमधील युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी स्थानिक रहीवाशांसमवेत ओरिएण्टल कॉलेजच्या प्राचार्य मौर्या व सानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत कामत यांना निवेदन देत या प्रकाराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
सानपाडा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सानपाडा रेल्वे स्टेशनपासू हाकेच्या अंतरावरच सानपाडा सेक्टर २ परिसरात ओरिएंटल कॉलेज आहे. कॉलेज विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या त्रासाबाबत सानपाडा सेक्टर २ मधील स्थानिक रहीवाशी त्रस्त झाल्याने पांडुरंग आमले यांनी मंगळवारी कॉलेजला व पोलिसांना निवेदन सादर केले. या कॉलेज विद्यार्थ्यांकडून सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात, कियॉस्क आवारात, पॉर्किग परिसरात, परिसरातील मोकळ्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे खुलेआमपणे होत असतात. स्थानिक रहीवाशी या प्रकाराने त्रस्त झाले असून महिलांना, मुलींना ये-जा करताना माना खाली घालूनच वावरावे लागते. याशिवाय या कॉलेज विद्यार्थ्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणावर आरडाओरड, एकमेकांना शिवीगाळ, दुचाकी वेगाने चालविणे, मुलींशी मस्ती, खुलेआमपणे मुला-मुलींकडून सिगारेटचे धुम्रपान होत आहे. अश्लिल चाळे प्रकाराने रहीवाशी संतप्त झाले आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांतील वादावरून या परिसरात मागे एकाची हत्याही झालेली आहे. काही दिवसापूर्वीच कॉलेज विद्यार्थ्यांच्या भांडणामध्ये विद्यार्थ्यांकडे चाकू-सुरेही सापडले होते. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थी घडविले जातात का गुन्हेगार असा संतप्त सवाल स्थानिक रहीवाशांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेला आव्हान देणाऱ्या या घटना पाहता हे कॉलेजच बंद करण्याची मागणी रहीवाशी करत आहेत. सानपाडा परिसरात ‘आमदार आपल्या दारी’ अभियानात आमदार मंदाताई म्हात्रे या सानपाडा येथे आल्या असता, स्थानिक रहीवाशांनी कॉलेज विद्यार्थ्यांच्या त्रासाबाबत विशेषत: खुलेआमपणे चालणारे अश्लिल चाळे याबाबत त्यांच्याकडे लेखी तक्रारही केल्या आहेत. समस्येमुळे स्थानिक रहीवाशांमध्ये उद्रेक वाढीस लागला आहे. अश्लिल चाळ्याबाबत स्थानिकांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केल्यास कॉलेज विद्यार्थ्यांकडून त्यांनाच शिवीगाळ व दमदाटी करण्यात येते. समस्येचे गांभीर्य पाहता आपण या कॉलेज परिसरात, स्टेशनच्या बाहेरील परिसरात, कियॉस्क आवारात, पॉर्किग आवारात, सेक्टर दोनमधील रस्ते, मोकळ्या जागा या ठिकाणी साध्या वेशातील पोलीसांची गस्त वाढवून या प्रकाराचा बिमोड करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याची मागणी ओरिएण्टल कॉलेजच्या प्राचार्य मौर्या व सानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत कामत यांच्याकडे निवेदनातून केली.
यावेळी प्राचार्य मौर्या यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकाराला आळा घालणे गरजेचे असल्याचे सांगत हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याचे सांगत पांडुरंग आमले व स्थानिक रहीवाशांचे आभार मानले. कॉलेज प्रशासन, पोलिस, समाजसेवक, स्थानिक रहीवाशी यांची संयुक्त समिती बनवत या समस्येचे निवारण करण्याचे कॉलेज प्राचार्यांनी बैठकीत पांडुरमग आमले यांना आश्वासन दिले. सानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत कामत यांनी तात्काळ गस्त वाढविण्याचे मान्य करत या समस्येचे निवारण करणार असल्याचे सांगितले. भारत कामत यांनी तात्काळ कॉलेजमध्ये संपर्क करत हे प्रकार थांबविण्यास सांगत यापुढे असे प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दयामाया दाखविणार नसल्याचे व ठोस पाऊले उचलणार असल्याचे सांगितले.
यावेळी पांडुरंग आमले यांच्यासमसवेत शिष्टमंडळात पामबीच ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीपाद पत्की, जयराम पत्की, विश्वास कणसे, आज्ञा गव्हाणे, मंगल वाव्हळ, कुलकर्णी, कोरोले, रिटा सोनी, वैशाली होळकर, दिपक होळकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थाचे व गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.