अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला एक वेळ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून वैद्यकीय तपासणी करून घेण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदिप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी तत्वावर सफाई कर्मचारी काम करत आहे. समान कामाला, समान वेतन ही घोषणा महापालिका प्रशासन सातत्याने करत असले तरी या सफाई कर्मचाऱ्यांना आजही तुटपुंज्या वेतनावरच काम करावे लागत आहे. याच कामगारांच्या परिश्रमामुळे, त्यांनी केलेल्या शहर स्वच्छतेमुळे नवी मुंबई शहराला नुकताच राज्यात प्रथम व देशात तिसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मिळालेले आहे. यापूर्वीही संत गाडगेबाबा स्वच्छ अभियानामध्ये राज्यात सलग दोन वेळा नवी मुंबई शहराला राज्यात दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे. सफाई कामगारांच्या परिश्रमामुळे महापालिका प्रशासनाला पुरस्कार मिळतात, पण ते पुरस्कार घ्यायला स्टेजवर सुटबुट घालून अधिकारी केंद्र व राज्य सरकार आयोजित कार्यक्रमात जातात. त्यांनी आयुष्यात कधी झाडू घेतला नाही, रस्ते-पदपथाची सफाई केली नाही, ते पुरस्कार घेतात व ज्यांच्यामुळे पुरस्कार सातत्याने मिळतात, ते सफाई कामगार मात्र तुटपुंज्या वेतनात आजही रस्त्यावर झाडू मारत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या कामगारांचा रस्ते, पदपथ सफाईमुळे दररोज धुळीशी, घाणीशी संबंध येत असतो. या सफाई कर्मचाऱ्यांची शेड ज्या ठिकाणी असते, तेथेही बकालपणा असतो. त्यामुळे त्यांना व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना विविध आजार जडण्याची भीती आहे. ज्यांच्यामुळे पुरस्कार मिळतात, त्यांची व त्यांच्या परिवाराची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. हे सफाई कामगार आपली संपत्ती आहे. त्यांची व त्यांच्या परिवाराची काळजी पालिका प्रशासनाने घेतलीच पाहिजे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी व त्यांच्या परिवाराच्या आरोग्य रक्षणासाठी, त्यांच्या जिविताची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महिन्यातून एक वेळ मोफत आरोग्य तपासणी करुन घ्यावी, यासाठी दर महिन्याला त्या त्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करावे. समस्येचे गांभीर्य व मागणीतील कळकळ पाहता आपण आरोग्य विभागाला सफाई कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या परिवारासाठी दर महिन्याला एक वेळा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी आरोग्य विभागाला निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.