Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नागपूर : नवी मुंबई बेलापूर विधानसभा क्षेत्रात सुसज्ज भव्य असे आगरी कोळी भवन उभारावे, अशी मागणी भाजपच्या बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदरबाबत सिडको व नवी मुंबई महानगरपालिका यांजसह संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सूचित केले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील आगरी कोळी समाजातील ग्रामस्थांच्या १००% जमिनी सिडकोने संपादित केल्या. नवी मुंबई नेरुळ येथे सिडकोमार्फत आगरी कोळी भवन उभारण्यात आले आहे. परंतु सदर भवन हे अतिशय छोटे असून समाजातील पारंपरिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होऊ शकत नाहीत. सदर भवनात आगरी कोळी समाजातील ग्रामस्थांना हॉल उपलब्ध न होता परप्रांतीयांना उपलब्ध केले जातात. सदर भवनातील लहानसहान कामेही स्थानिक ग्रामस्थांना न मिळता परप्रांतीयांना दिले जातात. भवन आगरी कोळ्यांचे परंतु वापर परप्रांतीयांना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये वाशी किंवा बेलापूर येथे मध्यवर्ती असे २ एकरच्या भूखंडावर भव्य व सुसज्ज असे नवीन आगरी कोळी भवन स्थानिक ग्रामस्थांकरीता उभारून दिल्यास स्थानिकांना त्याचा वापर करता येईल. आगरी कोळ्यांची संस्कृती जतन व्हावी, केवळ आगरी कोळी समाजातील नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता कमी रक्कम आकारून उपलब्ध करून दिल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. लवकरच सदरबाबत नगरविकास विभाग, सिडको व नवी मुंबई महापालिका यांजसह संयुक्त बैठक आयोजित करून नवी मुंबईत भव्य आगरी कोळी भवन उभारण्यात येईल असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.