अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ३४ मधील अनधिकृत बॅनरवर तातडीने कारवाई करून बकालपणा घालविण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव तसेच कुकशेत गाव परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात अंर्तगत व बाह्य रस्त्यावर, चौकाचौकात, सारसोळे बसडेपो, साईबाबा हॉटेल चौक, सेक्टर सहामधील समाजमंदिर चौक, राजीव गांधी उड्डाणपुलाखालील परिसर तसेच अन्यत्र बाराही महिने अनधिकृत होर्डींग व बॅनर लागलेले असतात. या अनधिकृत बॅनरमुळे त्या त्या परिसराला बकालपणा येतो आणि महापालिकेचे उत्पन्नही बुडते. असे असतानाही नेरुळ विभाग कार्यालयाचा अतिक्रमण विभाग या अनधिकृत बॅनरवर कारवाईस टाळाटाळ करून पालिकेच्या उत्पन्नात घट आणण्यास व परिसराचा बकालपणा वाढविण्यास मदत करत आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पालिकेला अधिकार असतानाही पालिका कारवाई करत नाही व गुन्हे दाखल करत नाहीत. आपण प्रभाग ३४ मध्ये लागलेले अनधिकृत बॅनर तातडीने हटवून परिसराचा बकालपणा घालविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.