संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : आपल्या जवळची माणसे गेल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही आपण उपस्थित राहू शकलो नाही याचेही दु:ख आपण पचवले. कोविड काळाने आपल्याला खूप काही शिकविले. या काळात नवी मुंबई महापालिकेने महापालिका क्षेत्रातील नागरिकांप्रमाणेच शेजारील शहरांमधील नागरिकांनाही उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. महापालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा ३१ वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे याचा आनंद व्यक्त करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या प्रगतीत सर्व घटकांचे अनमोल योगदान असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबई महापालिकेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित वर्धापनदिन सोहळयाप्रसंगी त्या आपल्या मनोगत व्यक्त करीत होत्या.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे, अनंत जाधव, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संखे, मदन वाघचौडे, शुभांगी दोडे, सुनिल लाड, प्रविण गाडे, सहा.आयुक्त दत्तात्रय घनवट, चंद्रकांत तायडे, महेंद्र सप्रे, सुखदेव येडवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील वर्षभरात नवी मुंबई महापालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पुरस्कार, सन्मान यांचा विशेष उल्लेख केला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत अभियांत्रिकी, आरोग्य, शिक्षण, समाजविकास, क्रीडा, स्वच्छता, सुशोभिकरण, पर्यावरण, सांस्कृतिक उपक्रम, प्रवासी सेवा अशा विविध क्षेत्रात वर्षभरात झालेल्या कामांचे सविस्तर विवेचन केले. नवी मुंबई महापालिकेला मिळालेल्या सर्व सन्मानात अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीचा महत्त्वाचा वाटा असून त्यासोबतच स्वच्छतेमधील देशात तृतीय व राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मानांकनात आपले स्वच्छता कर्मचारी व जागरुक नागरिक यांच्या सक्रिय सहभागाचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. आज ३१ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना यापुढील काळात आपल्या शहराची मानांकने अधिक उंचावत राहण्याचा निर्धार त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने व्यक्त केला.
याप्रसंगी डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे व डॉ. हरविंदर सिंग, समाजसेवक प्रतिभा देहाडे, अधिक्षक देवेंद्र ब्राम्हणे, वरिष्ठ लिपिक राजू रोहनकर, आरोग्य सहाय्यक सविता म्हामुणकर, जोडारी भरत देशमुख तसेच मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पाटील, प्राथमिक शिक्षिका संजीवनी गावंड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण दिवसभर महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंदाचे गीत, नृत्य, नाटय आदी कलागुणदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. नवी मुंबई महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयकॉनिक महापालिका मुख्यालय इमारतीस करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुख्यालय परिसराला भेट देत आहेत.