नववर्षाची दिनदर्शका देवून केला पालिका आयुक्तांचा सत्कार
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या विविध आस्थापनेत कार्यरत असणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत व सहकार्याबाबत इंटकसंलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनने नवी मुंबई महानगरपालिकेचे हंगामी आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार मानत त्यांचा यावेळी दिनदर्शिका देवून सत्कार करण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर हे सध्या रजेवर असल्याने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे सध्या नवी मुंबई महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. अभिजित बांगर यांची नुकतीच ठाणे महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांनी यापूर्वी कोरोना महामारीच्या अवघड काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सर्वच आस्थापनेतील तसेच संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांबाबत तसेच असुविधांबाबत नवी मुंबई इंटक व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा असतो. शिष्टमंडळ नेवून कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीत समस्या मांडणे, लेखी पाठपुरावा करणे, निदर्शने करणे हे कार्य कामगार नेते रविंद्र सावंत व त्यांचे सहकारी नेहमीच करत असतात. अभिजित बांगर यांच्या आयुक्तपदाच्या काळात त्यांनी कर्मचारी अधिकारी यांचे बरेच वर्ष रखडलेले प्रशासनातील प्रश्न मार्गी लावले. आश्वासित प्रगती योजना पदोन्नती, आकृतिबंधमधील बदल तसेच कर्मचारी सेवेबाबतचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवणे, ठोक माधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच शिक्षकांचा कायम करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागात पाठवणे, समान कामाला समान वेतन हा प्रस्ताव पण नगरविकास विभागात पाठवणे आदी कामे बांगर यांच्या काळात गतीमान पद्धतीने झाली. त्यांच्या काळात काही संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवाही कायम झाली. तडकाफडकी बदली झाल्याने ते लगेच ठाणे पालिकेत रुजू झाले आहेत.
अभिजित बांगर यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कालावधीत त्यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत व असुविधांबाबत नवी मुंबई इंटकने तसेच इंटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केलेल्या पाठपुराव्याला अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची भूमिका घेतलेली होती. त्या कार्याबाबत अभिजित बांगर यांचा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिनदर्शिका देत सत्कार केला आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वाहन विभागाचे युनिट अध्यक्ष राजेंद्र सुतार, संजय राघवन, कृष्णा घनवट, ठोक मानधन शिक्षक युनिटचे अध्यक्ष संदेश सुर्वे उपस्थित होते.