नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८,१०, ६ तसेच कुकशेत गाव आणि सारसोळे गावातील विद्यार्थ्यांना नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधा नेरूळ सेक्टर सहामधील तसेच कुकशेत गावातील भाजप जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहीती भाजपच्या स्थानिक नगरसेविका व महिला-बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
नगरसेविका सुजाताताई पाटील हा भाजपचा नेरूळ पश्चिममधील उच्चविद्याविभूषित (वाणिज्य शाखा द्विपदवीधर) चेहरा असून महापालिका सभागृहात असताना रहीवाशांची विकासकामे करवून घेणे, समस्या सोडविणे, वेळ पडल्यास सभागृहात जमिनीवर बसणे अशा कार्यप्रणालीमुळे नेरूळ पश्चिममधील रहीवाशांना विशेषत: महिला वर्गामध्ये सुजाताताई पाटील या नेतृत्वाविषयी विशेष आपुलकीची भावना राहीली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाचा कार्यभार सांभाळताना त्यांनी नवी मुंबईकरांसाठी कर्करोग शिबिराचे आयोजन प्रभागाप्रभागात महापालिकेच्या माध्यमातून करताना पदावर काम करणारी व्यक्ति बसली तरच त्या पदाला शोभा येते हे सुजाताताई पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना पालिका प्रशासनाकडून शिष्यवृत्ती देवून त्यांना आर्थिक हातभार लावला जातो व शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते. शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरावयाचे असल्याने तसेच सर्वांच्याच घरात संगणक, इंटरनेट नसल्याने सुजाताताई पाटील यांनी गरीब तसेच मध्य उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरताना कोणताही अडथळा येवू नये तसेच अर्ज भरण्यास विलंब होवून नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील तसेच सारसोळे व कुकसेत गावातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी सुजाताताई पाटील यांनी कुकशेत व नेरूळ सेक्टर सहामधील भाजप कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सुजाताताई पाटील यांनी केले आहे.