नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६ परिसरात निर्माण झालेल्या पाणीसमस्येवर तातडीने तोडगा काढण्याची लेखी मागणी प्रभाग ८५च्या नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६ परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात टॉवर, सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या, साडे बारा टक्के भुखंडावरील सोसायट्या, गावठाण इमारतींचा समावेश होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासनाकडून अनेकदा न सांगता पाणीपुरवठा केला जात नाही. पाणी सातत्याने कमी दाबाने येत असल्याची व त्यामुळे पाणी माफकही मिळत नसल्याची स्थानिक रहीवाशांची तक्रार आहे.सोमवारी रात्री नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाकडून पाणी आलेच नाही. मंगळवारी सकाळी उशिरा पाणी आले, तेही कमी दाबाने आले. महापालिकेचे मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असतानाही नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना सहन करावी लागणारी पाणीटंचाई ही या रहीवाशांची महापालिका प्रशासनाकडून होत असलेली पिळवणूक आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी उपलब्ध करून न देणे, कमी दाबाचा पाणीपुरवठा यामुळे नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. करदात्या नागरिकांची पाण्याच्या बाबतीत ससेहोलपट का केली जात आहे? पाण्याचे देयक ते नियमितपणे भरत असताना त्यांना कमी दाबाने पाणी पुरवठा का केला जात आहे? नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांच्या संयम व सहनशीलतेचा अंत पाहू नका. समस्येचे गांभीर्य पाहता कमी दाबाचा पाणीपुरवठा व पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा उपलब्ध न करून देणे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.