एका मध्यमवर्गीय व्यक्तीची सगळी धडपड मुलांसाठी भरपूर पैसा कमवण्याची किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवण्यासाठी असते. मध्यमवर्गीय यासाठी म्हटलेय की गरीब आणि श्रीमंत हे दोन्ही वर्ग त्या भानगडीत पडत नाहीत. श्रीमंत वर्गात बापजाद्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी भरपूर कमावून ठेवलेले असते आणि गरीब वर्गात श्रीमंतीच्या वारसा,उसने अवसान काहीच नसल्याने कमवा आणि खा हा संस्कार असतो. वांदे सगळे मध्यमवर्गाचे झालेले असतात. बापाच्या पगारावर कुटुंब चालत असेल तर तो घाण्याचा बैलासारखा रिटायर होईपर्यंत राबत असतो. त्याच्या ऐन उमेदीच्या काळात मुलांच्या शिक्षणावर त्याला लक्ष केंद्रित करावे लागते. पुढे काही वर्ष मुलांना पैसे पाठविण्यातच तो कधी म्हातारा होतो त्यालाच कळत नाही. त्याची बायकोही घाण्याला जुंपलेली असतेच,तिची हौस,मौज,आवडनिवड कधी निर्माल्य होते याचे भान तिलाही राहत नाही. मुलं पदवीधर होतात अन या दोघांनाही तुम्ही आमच्यासाठी काय केले हे विचारतात तेव्हा तेव्हा मध्यमवर्गीय आईबाप अर्धमेले होतात.
आपण सगळे कसे कुणाकडे तरी बघूनच वागत असतो. शेजाऱ्याचा मुलगा पुण्याला पाठवला तर आपणही उसने पासने करून पोराला तिकडेच पाठवतो. ज्या वयात मुलांची आपल्यात भावनिक गुंतवणूक अपेक्षित असते त्या काळात मुले बाहेर असतात . सुखदुःखाची देवाणघेवाण व्हिडीओ कॉलवर सुरु असते. काहीही संकट आले तरी आईबाप घेतात भागवून असा संदेश आपणच मुलांना देत असतो. शेवटच्या घटका मोजण्याची वेळ आली तरी तुझा अभ्यास पडू देऊ नकोस ,आम्ही खुशाल आहोत, हे बापाचे शब्द कोसोदूर असणाऱ्या पोरांना बेफिकीर बनवत असतात. असंख्य मुलं कोडगी बनतात. आईबापाच्या चेहऱ्यावर असलेले काहीच त्यांना वाचता येत नाही ,कारण ते वाचण्याचे धडे आम्ही त्यांना दिले नाहीत. भाव,भावना,ओढ,आत्मीयता,भावनिक गुंतवणूक असे चेक बाऊन्स करीत मुलंही यंत्रवत पैश्याच्या मागे धावायला लागतात.
पूत सपूत तो काहे धनसंचय ? पूत कपूत तो काहे धनसंचय ? असा वास्तव प्रश्न विचारणारी एक म्हण उत्तर भारतात वापरली जाते. मुलगा चांगला निघाला असेल तर कशाला हवाय पैसा ? कारण तो पुढे कमावणार आहेच ना. जर मुलगा नालायक,व्यसनी किंवा दिवटा निघाला असेल तरी पैसा ,संपत्ती ठेवण्याची गरज नाही कारण तो काहीच शिल्लक ठेवणार नाही. थोडक्यात दोन्ही बाजूनी विचार केल्यास बापाने मुलांसाठी पैसा, संपत्ती जमवून ठेवण्याची गरज नाही असा या म्हणीचा अर्थ आहे. मुंबई,पुण्यात उत्तर भारतीयांचे येणारे लोंढे आणि काही वर्षात गडगंज होणारे उत्तर भारतीय बघितले तर ज्याने कुणी ही म्हण काढली असेल त्याच्या दूरदृष्टीची खरंच कमाल वाटते. नाहीतर आम्ही लोक,स्वतःचे आयुष्य जगण्याचे सोडून मुलांसाठी जमा करण्यात आयुष्याची माती करीत असतो.
इंग्रजी शाळांत शिकवून त्याच्या डोक्यात विदेश किंवा नोकऱ्यांचे वेगवेगळे पॅकेज टाकून पैसा कमावणाऱ्या यंत्रात अलीकडे मुलांचे रूपांतर करणारे पालक तयार झाले आहेत. आईबापाला सर्दी झाली तरी शाळा बुडवून त्यांच्या सेवेत दिवस घालवणारी मुले अलीकडे आईबापाच्या खाट धरली तरी कुठल्यातरी देशातून व्हिडीओ कॉल करीत कोणती औषधे घ्यावीत यावर कोरडे सल्ले देतात. किमान सहा महिने तरी मला यायला जमणार नसल्याची थापही मारतात. कोरोनात तर असे हजारो ममाज बॉय उघडे पडले आहेत. त्यांचे काही चुकले असेल असे वाटत नाही. मुले यंत्रवत झालीत त्याची कारणे आपल्याच जवळ आहेत हे मान्य करताना विंचू डसल्याच्या वेदना होतात,त्या सहन करण्याची क्षमता आता आपल्यात राहिली नाही हे खरे कारण आहे.
मुळात एक गोष्ट आताच ठरविण्याची गरज आहे. आपल्याला मुलं कोणत्या स्वरूपात हवी आहेत ? मशीन की माणूस ? माणूस म्हणून पुढच्या पिढ्या आपल्याला हव्या असतील तर कुणाचे अनुकरण नको,ज्या वयात टी आपल्या जवळ हवीत तेव्हा काहीही करून ती जवळच असायला हवीत. त्यांच्यावर सगळ्याच प्रकारचे संस्कार व्हायला हवेत . कला,साहित्य,संस्कृती,अभिनय,यात्रा-जत्रा, लोककला, माया, ममता, हक्क,अधिकार, कर्तव्ये या भट्टीतून त्यांना काढायलाच हवे तरच मुलांमध्ये उपजत वृत्ती वाढायला लागेल आणि त्यांच्यात येणारी कृत्रिमता कमी व्हायला लागेल. गावातली किंवा नात्यांमधली असंख्य उदाहरणे आपल्या समोर असताना आपण आताच सावध झालो नाहीतर कधीच होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन पुढच्या पिढ्यांवर काम करावे लागेल. तरच गोड फळे मिळतील.
००
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद – ९८९२१६२२४८