जयवंत शिंदे
नवी मुंबई : गोवरची साथ नियत्रंणात आल्याने व लसीकरणामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची सुतरामही शक्यता नसल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरात लवकर घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेच्याही निवडणूकांचा कार्यक्रमही आगामी चार महिन्यात लागणार आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ऐरोली व बेलापुर असे दोन विधानसभा मतदारसंघ येत असून मागील पालिका सभागृहातील सत्ताधारी भाजपला ऐरोलीच्या तुलनेत बेलापुरमध्ये अनुकूल वातावरण मानले जात आहे.
नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात भाजपचे आमदार गणेश नाईक तर बेलापुर विधानसभा कार्यक्षेत्रात भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या आहेत. काही महिन्यापूर्वी भाजप आणि मविआमध्ये निकराची लढत होईल असे चित्र असतानाच शिवसेना फुटली व त्यातून शिंदे गट व ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले. मविआतील शिवसेना हाच प्रबळ घटक असताना व तोच फुटल्याने नवी मुंबईतील मविआ आता पहिल्याइतकी प्रभावी राहीलेली नाही. शिवसेना फुटीचा नवी मुंबईतील घडामोडीवरही परिणाम झाला आहे. शिंदे गटाचा ऐरोली मतदारसंघावर तर शिवसेना ठाकरे गटाचा बेलापुर मतदारसंघावर विशेष प्रभाव आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यावर भाजप, शिवसेवा दोन्ही गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. घणसोली कॉलनी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी तेथील राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बरांना शिंदे गटात जाण्याचे राजकीय डोहाळे लागल्याने राष्ट्रवादीच्या प्रभावाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होवू शकते.
बेलापुरच्या यशावर भाजपची प्रामुख्याने मदार असल्याने स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मतदारसंघात केलेली कामे, त्यांचा व्यक्तिश: असलेला प्रभागाप्रभागातील जनसंपर्क, तसेच सोशल मिडियावरील त्यांची सक्रियता, व्हॉटसअप ग्रुपवरील संभाषणात त्यांच्याकडून सातत्याने भाजपची बाजू मांडणे, फोनवर स्वत:च संपर्कात राहणे यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांचा अन्य राजकारण्यांच्या तुलनेत जनतेशी अधिकाधिक थेट संपर्क असतो. नुकतेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आणल्याने बेलापुर मतदारसंघात आमदार मंदाताईच्या कार्याला व लोकप्रियतेला शह देवू शकेल इतपत विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्व नाही. आमदार मंदाताईंना विरोधकांकडून मान-सन्मानाची व आदरपूर्वक मिळत असलेली वागणूक जनसामान्यांपासून लपून राहीलेली नाही. त्यातच गणेश नाईकांसमवेत राष्ट्रवादीतून मातब्बर नगरसेवकांची भाजपला आयती रसद मिळाल्याने पालिका सभागृहात भाजपला सत्ता संपादन करणे शक्य झाले होते.
भाजपमधील दोन मातब्बरांमधील वाद जगजाहिर आहे. या वादामध्ये आपले नुकसान नको म्हणून अनेक नगरसेवकांकडुन दोन्ही गटाशी गोडवा कायम ठेवला जात आहे. बेलापुर मतदारसंघात तिकिट वाटपामध्ये स्थानिक आमदार या नात्याने मंदाताई म्हात्रे यांच्या शब्दाला वजन अनायसे मिळणार असल्याने त्यांच्याशी गोडवा ठेवण्यातच हित असल्याचा सुज्ञ विचार करत पलिकडच्या गटातील नगरसेवकांनी आपली भूमिका पडद्याआडून बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे.
शिवसेना फुटीमुळे ठाकरे गट काही प्रमाणात कमकुवत झाला असला तरी नेरूळ, सानपाडा, जुईनगरमध्ये ठाकरे गटाचा प्रभाव आजही कायम आहे. ऐरोलीत मढवी परिवाराने ठाकरे गटाशी निष्ठा दाखविल्याने शिंदे गटाच्या प्रभावाला काही प्रमाणात तडा बसणार आहे. नेरूळमध्ये गावडे पितापुत्री राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात गेल्यामुळे नेरूळ-सिवूडस भागात शिंदे गटाचा प्रभाव वाढीस लागला आहे. पालिकेत सत्ता मिळविणे भाजपासाठी प्रतिष्ठेची बाब असल्याने त्यात बेलापुरमधील यश भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ऐरोली, घणसोली, तुर्भे परिसरात राष्ट्रवादी व शिंदे गटाचा प्रभाव ऐरोली मतदारसंघातील भाजपच्या संख्याबळाला अडथळा आणण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटाची पालिकेत रसद मिळण्याची शक्यता असल्याने भाजपला सत्ता मिळविण्यास मदत होईल. त्यामुळे भाजपला सत्ता मिळविण्यासाठी बेलापुरच्या यशाचा महत्वाचा वाटा राहणार असल्याने स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निवडणूक निकालानंतर नवी मुंबईच्या व भाजपच्या राजकारणात महत्व वाढीस लागणार असल्याचे राजकारणात उघडपणे बोलले जात आहे.