महानगरपालिकेचा ३१वा वर्धापनदिवस उत्साहात साजरा झाला व त्यापाठोपाठ तीनच दिवसांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही पालिका प्रशासनाकडून साजरी करण्यात आली. सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा मिळाला, त्यापासून प्रेरणा घेण्याचा संकल्पही करण्यात आला. नवी मुंबईच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात, शैक्षणिक प्रवाहात व इतरही क्षेत्रात सावित्रीच्या लेकी चमकत आहेत, आपला ठसा उमटवत आहेत. महापालिका पाच सभागृहात असंख्य नगरसेविका आल्या, गेल्या, त्यातील काही महापौर बनल्या तर कोणाला नेते मंडळींच्या आशिर्वादाने स्थायी समितीच्या तिजोरीचे राखणदार बनण्याचीही संधी मिळाली. पण महापालिका सभागृहात नगरसेविका ते आमदार अशी दमदार कामगिरी करणाऱ्या सौ. मंदाताई म्हात्रे या एकमेव सावित्रींच्या लेकीच्या कार्याची दखल महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहाला घ्यावी लागली आहे. बाकी अन्य महिला नगरसेविकांना सुषमा दंडेंचा अपवाद वगळता त्यांच्या प्रभागाव्यतिरिक्त अन्यत्र ठसा उमटवता आला नाही.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंच्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभागृहापासूनच झाला. नगरसेविका ते महिला बालकल्याण समितीच्या सभापती इतपतच त्यांचा प्रवास सिमित राहीला. महापालिका सभागृहात मनिषा भोईर, सुषमा दंडे, अंजनी भोईर, विजया म्हात्रे या महिला महापौरपदी विराजमान झाल्या. नेत्रा शिर्केंना स्थायी समिती सभापतीपदाची धुरा सांभाळण्यास मिळाली. सभागृहात महिला नगरसेविकांचे संख्याबळ ठळकपणे पहावयास मिळते. पण या नगरसेविकांना दुर्दैवाने नवी मुंबईच्या राजकारणात आपला स्वतंत्र प्रभाव निर्माण करण्यात, ठसा उमटवण्यात अपयशच आले. काही प्रमाणात संघटनात्मक पातळीवर काम करताना मनसेच्या आरती धुमाळ, भाजपच्या प्रा. वर्षा भोसले, राष्ट्रवादीच्या माधुरी सुतार यांना नवी मुंबईत काही प्रमाणात नावलौकीक मिळविणे शक्य झाले. पण मंदाताई म्हात्रे या बहूजन वर्गातील महिलेने राजकिय पार्श्वभूमी नसतानाही मारलेली गरुडभरारी ही प्रशंसनीय व प्रेरणादायी स्वरुपाची आहे. नगरसेविका, महिला बालकल्याण समिती सभापती, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद, विधान परिषद सदस्या, दोन वेळा बेलापुर विधानसभा मतदारसंघातून आमदार अशी त्यांची आजवरची वाटचाल आहे. नवी मुंबईच्या राजकारणात शेकडों महिला राजकारणात व समाजकारणात कार्यरत आहेत. परंतु त्या सर्वांतून केवळ राजकीय गरुडभरारी मारणे केवळ मंदाताई म्हात्रे यांनाच शक्य झाले आहे.
१९९५ ते २००० या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात त्या नगरसेविका बनल्यावर १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना होताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यातील नेतृत्वक्षमता व महिला संघटन बांधणीचे कौशल्य पाहता मंदाताईंकडे शरद पवारांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षपदाची धुरा सोपविली. पदाला न्याय देताना त्याकाळात मंदाताईंनी महाराष्ट्र पिंजून काढला. राष्ट्रवादीचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बबनराव पाचपुते यांच्या तोडीस तोड महिलांची संघटना उभारण्याची किमया मंदाताईंनी करुन दाखविली होती. औरंगाबादला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंदाताईंच्या नेतृत्वाखाली भरलेल्या महिला मेळाव्याची व मंदाताईंच्या नेतृत्वाची भाजपा नेते कै. गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. पक्षसंघटनात्मक कार्याची पोचपावती म्हणून शरद पवारांनी मंदाताईंना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठविले.
स्थानिक राजकारणातील कुरघोड्या, मतभेद याला कंटाळून मंदाताईंनी २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीअगोदर भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपनेही त्यांच्या कर्तृत्वाला न्याय देताना त्यांना विधानसभेची बेलापुर मतदारसंघातून तिकिट दिले. भाजपने दिलेल्या संधीचे सोने मंदाताईंनी कर्तृत्वाच्या बळावर करुन दाखविले. जी किमया सुरेश हावरेंसारख्या दिग्गजाला करुन दाखविता आली नाही, ती मंदाताईंनी करुन दाखविली. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत अन्य उमेदवारांचा दणदणीत पराभव करत मानसन्मानाने मंदाताईंनी विधानसभेत प्रवेश केला.
सौ. मंदाताई म्हात्रे म्हणजे एक चक्रीवादळच म्हटले तरी ते संयुक्तिक ठरेल. पावलापावलावर प्रस्थापित राजकारण्यांनी निर्माण केलेल्या आव्हानांचा लीलया बिमोड करत नवी मुंबईच्या राजकारणात त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. स्पष्टवक्तेपणा, करारी बाणा, रोखठोकपणा, सत्प्रवृत्तींचा सन्मान आणि अपप्रवृत्तींना ठेचून काढणे हीच त्यांच्या आजवरच्या सामाजिक व राजकीय वाटचालीची कार्यप्रणाली बनल्याने नवी मुंबईच्या महिलांमध्ये मंदाताई म्हात्रेंविषयी एक आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे. सौ. मंदाताई म्हात्रे यांचा आजही राजकीय संघर्ष सुरुच आहे. त्यांच्या वाटेवर काटे पसरण्याचे षडयंत्र अजूनही थांबलेले नाही. उसकी कमिज मेरी कमिजसे अच्छी क्यू है, याचे उत्तर न शोधता मंदाताईंच्या वाटचालीमध्ये, कार्यामध्ये अडथळे आणण्याचे काम सुरुच आहे. तीन दशके राजकीय वाटचाल करताना या आक्रमक नेतृत्वाला, रणरागिनीला खासगीत बोलताना अनेक जण आदरपूर्वक नवी मुंबईची वाघिण असेच संबोधतात.
कोरोना महामारीच्या काळात मतदारसंघातील गरजूंना मदत करताना धान्य तर वेळोवेळी पाठविले. पण त्यांच्या महिलेने, अन्नपूर्णेंने गोरगरीबांना दोन वेळचे जेवणाचे डब्बेही पोहोचविण्याचे काम गेली अनेक महिने अखंडपणे सुरुच ठेवले. मंदाताईंनी राजकीय समर्थंक वाढविण्यात वेळ न दवडता जनतेची नस ओळखत सर्वसामान्यांची कामे करण्याचा प्राधान्य दिले. त्यामुळेच जनाधार वाढत गेला. पावलापावलावर अडथळे येत गेल्याने नवी मुंबईकरांमध्ये मंदाताईंप्रती सहानुभूती वाढीस लागली व त्यांची सर्वत्र प्रशंसाही होवू लागली. सोशल मिडियावर मंदाताईंची सक्रियता युवा पिढीमध्ये जवळीकता साधत आहे. आमदार स्वत: व्हॉटसअपवर बोलतात, वादविवाद करतात, आपली भूमिका मांडतात, चुकीचे खोडून काढतात, विरोधकांचे बरोबर असले तर मान्यही करतात. मंदाताईंच्या सोशल मिडियावरील सक्रियतेने युवा पिढीमध्ये वेगळेच अस्तित्व निर्माण केले आहे. फेसबुकवरही त्यांचे फॉलोअर्स आहेत. ते त्यांचा फोन स्वत: हाताळत असल्याने व फोनवर त्याच उपलब्ध होत असल्याने त्यांच्या कार्यालयात व राजकीय जीवनात पीएगिरीचे अवडंबर अथवा प्रस्थ वाढले नाही.
सावित्रीच्या अनेक लेकी त्या त्या क्षेत्रात नवी मुंबईमध्ये कार्यरत आहे. मंदाताई म्हात्रे या खऱ्या अर्थांने त्यांच्या कार्यातून सावित्रीच्या लेकी सिद्ध झाल्या आहेत. त्यांनाही त्यांच्या राजकीय सारीपाटावर प्रस्थापिताकडून टाकण्यात आलेल्या काट्यावरुनच वाटचाल करावी लागत आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्ताने नवी मुंबईतील एका सावित्रीच्या लेकीचा जीवनपट अन्य युवतींसाठी, महिलांसाठी प्रेरणादायी असाच आहे.