मंदाताई म्हात्रे हे नाव नवी मुंबईच्या नाही तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यकक्षा ओंलाडून महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावलेले एक नाव आहे. नगरसेविका मंदाताई म्हात्रे ते तीन वेळा आमदारकी भूषविणाऱ्या मंदाताई म्हात्रे ही वाटचाल काट्यांनी, खाचखळग्यांनी आणि प्रभावी विरोधी अडथळ्यांची होती. परंतु खमक्या मंदाताईंची आक्रमकता सर्वांना पुरुन उरली. त्या आल्या, त्यांनी पाहिले, त्यांनी संघर्ष केला आणि त्या विजयी झाल्या असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. २० जानेवारी हा आमदार मंदाताई म्हात्रे यांचा जन्मदिवस. नवी मुंबईनेच नाही तर ठाणे जिल्ह्याने मंदाताईंची वेगवेगळी रुपे जवळून पाहिली आहेत, अनुभवली आहेत. मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि आक्रमकता यांचा मिलाफ मंदाताईंच्या वाटचालीत ठासून भरलेला आहे. विरोधकांच्याही मनामध्ये धडकी भरविणारी वाघिण म्हणूनही मंदाताईंना खासगीत संबोधले जात आहे. ओठात एक आणि पोटात एक ही कार्यप्रणाली अनेक राजकारण्यांची असते. परंतु मंदाताईंचा कारभार म्हणजे रोखठोक स्वभाव. राजकीय, सामजिक जीवनातील वाटचालीत सातत्याने विरोधकांकडून व हितशत्रूंनी सातत्याने चक्रव्यूह रचले जातात. पण आजवरचे चक्रव्यूह भेदण्यात, विरोधकांचे, हितशत्रूंची कारस्थाने हाणून पाडण्यात मंदाताई आजवर सातत्याने यशस्वी ठरल्या आहेत. सातत्याने होणारा विरोध, षडयंत्रे, कटकारस्थाने, अडथळे ही हाणून पाडणे हा त्यांच्या जीवनातील वाटचालीचा एक अविभाज्य अंगच बनला आहे.
गेली साडेतीन दशके मंदाताई या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. १९९५ साली नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीमध्ये त्या बेलापूरमधून नगरसेविका झाल्या असल्या तरी त्यापूर्वीपासून सामाजिक क्षेत्रात त्यांचे सक्रीय योगदान आहे. नवी मुंबई ही मुळची आगरी-कोळी समाजाची. येथील प्रकल्पग्रस्तांमध्ये प्राधान्याने याच समाजाचा समावेश. या समाजाचे योग्य प्रबोधन झाले नसल्याने मंदाताईंनी पूर्वीपासूनच या समाजाचे प्रबोधन करण्यावर भर दिला. हाताला रोजगार व पोटाला अन्न मिळाले तरच प्रगती करणे साध्य होत असल्याने मंदाताईंनी विविध आस्थापणांमध्ये या स्थानिक समाजाला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजातील अनेकांना व्यवसाय करण्यासाठी मदतीचा हातभारही लावलेला आहे. पदे येतात व जातात. परंतु पदावर असतानाही जमिनीवर पाय ठेवून कार्यरत राहणे ही आजही मंदाताईंच्या स्वभावाची खासियत राहीलेली आहे. समाजामध्ये सातत्याने जनसेवा केल्याने जनसामान्यांमध्ये त्यांना आदराचे स्थान मिळाले ते आजतागायत कायम आहे. मंदाताई महिला असल्याने त्यांना आजवरच्या वाटचालीत सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकदा करण्यात आला होता, आजही होत आहे आणि उद्याही त्रास होत राहणार याची मंदाताईंनाही जाणिव असणार. महिलांना राजकारणात अथवा कुठल्याही क्षेत्रात सहजासहजी यश मिळत नाही. ध्येयाने काम करुन परिश्रमपूर्वक ते स्थान निर्माण करावे लागते. कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:चे अस्तित्व निर्माण केल्यास सर्वच क्षेत्रात तुमचा निभाव लागेल व प्रभाव वाढेल ही मंदाताईंनी कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
नवी मुंबईत महाराष्ट्र भवनाची निर्मिती व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून मंदाताई पाठपुरावा करत आहेत. नवी मुंबईत अन्य राज्यांची भवने दिमाखात उभी राहत असताना महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्राचे भवन अजूनही उभे राहीले नसल्याचा संताप मंदाताईंनी प्रशासन दरबारी अगदी मंत्रालयीन पातळीवरही वारंवार व्यक्त केला आहे. नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंदाताईंनी प्रशासनदरबारी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे मंजूर झाले. मंदाताईंच्या हातून जनसामान्यांच्या हिताचे कार्य मार्गी लागत असल्याने जनसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता या माध्यमातून अधिकाधिक जनताभिमुख होईल असा ग्रह मनाशी बांधत काही राजकीय घटकांनी पडद्याआडून या कामात खो घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न मंदाताईंनी हाणून पाडला आहे. मंदाताईंच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने भुखंडाचा पहिला हफ्ता भरला असून लवकरच पालिका प्रशासन दुसराही हफ्ता भरणार आहे. मंदाताईंमुळेच नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी सुविधेबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयही होणार असल्याने विद्यार्थ्यांना नवी मुंबईतच शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याचा व शिक्षणाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. मंदाताई या बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या अतिरिक्त भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. गाळे विकत घेवून ते चालत नसल्याने व्यापाऱ्यांसह त्यांच्या परिवाराच्या तोंडचे पाणी पळाले आहे. व्यापारी कर्जबारी झाले होते. व्याजावर व्याज वाढत होते. हतबल झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंदाताईंनी पुढाकार घेतला. हे मार्केट बहूउद्देशीय मार्केट बनावे, कृषीसंबंधित सर्व उत्पादनांची विक्री व्हावी यासाठी मंदाताईंनी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केला. तत्कालीन पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून अतिरिक्त भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांची समस्या मार्गी लावली. मार्केट आवारात अनेक आमदार कार्यरत असतानाही ही किमया केवळ मंदाताईंमुळेच शक्य झाले असल्याचे आज पाचही मार्केटमधील घटकांकडून उघडपणे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईचे नियोजन करताना सिडकोकडून स्थानिक ग्रामस्थांवर, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला. या अन्यायाविरोधात मंदाताईंनी सातत्याने कार्यरत राहून स्थानिक ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा व त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. जेट्टी व्हिजन ही मंदाताईंची महत्वाकांक्षा योजना. यासाठी सतत प्रशासनदरबारी पाठपुरावा करताना जेट्टी उभारणी, जेटीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यावर मंदाताईंनी भर दिला. दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज बनण्यावर भर दिला. तेथील जेटीवर सुधारणा उपलब्ध करुन दिल्या. वाहन पार्किगची सोय करुन दिली. मच्छिमार्केट उभारले. सारसोळेच्या जेटीसाठीही त्यांनी आमदारनिधी उपलब्ध करुन दिला होता. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी आपल्यातील मतभेद, वाद बाजूला ठेवून एकत्रित आल्यास गावचा विकास लवकर होतो, याबाबत नवी मुंबईतील ग्रामस्थांना मंदाताईंकडून सातत्याने प्रबोधन केले जात असते. प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असो व त्यांना सुविधा मिळण्याचा प्रश्न असो. मंदाताईंनी प्रशासनाच्या माध्यमातून ही कामे मार्गी लावली आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या घरांना तीनपट मालमत्ता कर आकारण्यात आला होता. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कमी करण्यात आला. मंदाताईंमुळे हा मालमत्ता कर एकपट झाला असून लवकरच या निर्णयाचे आदेश प्रशासनाकडून निघणार आहेत. मंदाताईंमुळेच प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा सर्व्हे होवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे. नवी मुंबईच्या शहरी भागातील इमारतींच्या पुर्नविकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अनेक निर्णय मंदाताईंच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने घेतले आहेत. सिडकोचा भाडेपट्टा ६० वर्षांवरून ९९ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे. सीबीडी येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करण्यात आले. सानपाडा येथे सेंट्रल लायब्ररीचे काम प्रगतीपथावर आहे. पुर्नविकासाच्या सहमतीसाठी १०० टक्केची अट ५१ टक्केवर आणण्यात आली आहे. आमदार मंदाताईंच्या कामाची यादी लांबलचक आहे.
सोशल मिडिया या नवीन प्रकाराचे तंत्र आणि मंत्रही मंदाताईंनी चांगलेच आत्मसात केले आहे. अनेक व्हॉटसअप ग्रुपवर त्या स्वत: सक्रिय असून आपली भूमिका त्या स्वत: मांडत असतात. स्वत: मंदाताई आपल्या ग्रुपवर असतात, चर्चेत सहभागी होतात, असे आजही अनेक युवकांकडून अभिमानाने सांगितले जात आहे. मंदाताई स्वत: त्यांचा फोन स्वत:जवळ ठेवत असल्याने सर्वसामान्य जनतेला त्यांच्याशी थेट संपर्क साधणे शक्य होते. मंदाताईंना संपर्क साधण्यासाठी, त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नसल्याचे नवी मुंबईकरांकडून सांगण्यात येते. मंदाताई म्हात्रे आज अनेक महिलांचा आदर्श बनल्या आहेत. अडचणींचा चक्रव्यूह भेदून गरुडभरारी मारणाऱ्या मंदाताईंचा महिला वर्गाला अभिमान आहे. जनसामान्यांशी जवळीक साधणाऱ्या व स्वत:च्या कार्यातून जनसामान्यांमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबई लाईव्ह परिवाराकडून वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा.