अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण जगात भारताचा सन्मान वाढला असून सामर्थ्यवान पिढी घडत असल्याचे चित्र देशात दिसते आहे, असे प्रतिपादन लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘परीक्षेपे चर्चा’ या उपक्रमांतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक्झाम वॉरियर्स भव्य चित्रकला स्पर्धा २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कल्पकतेने चित्रे रेखाटली.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये बुधवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात विद्यार्थी आणि पालकांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी लोकनेते आमदार गणेश नाईक ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील ,माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार आणि श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपाच्या समन्वयक प्राध्यापिका वर्षा भोसले, आंतरराष्ट्रीय खोखोपटू शितल भोर, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका माधुरी सुतार, माजी स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, खेळ, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते आमदार नाईक यांनी भारताची आर्थिक प्रगती पाहता भविष्यामध्ये आपला देश आर्थिक महासत्ता झाला तर नवल वाटायला नको असे सांगितले. २०१४ नंतर मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर जनसामान्यांसाठी अनेक प्रभावी योजना आणल्या. उज्वला योजनेमधून गाव खेड्यातल्या महिला भगिनींना गॅस उपलब्ध करून दिला. आरोग्याच्या योजनांमधून लाखो नागरिक मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घेत आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये सूक्ष्म लघु, मध्यम उद्योगांना बळ दिले जात आहे. विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ, महिला सर्वच घटकांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे.
कोरोनाच्या संकटकाळात वैज्ञानिकांना पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे भारताने स्वदेशी कोविड लस उत्पादित केली. ती जगातल्या अन्य देशांनाही दिली. भारताचे सैन्य सामर्थ्य वाढविल्याने शत्रू राष्ट्रांना भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही. पंतप्रधानांच्या प्राधान्यक्रमामध्ये विद्यार्थी वर्ग हा अग्रस्थानी असून एक सामर्थ्यवान पिढी घडवण्याचे काम देशांमध्ये सुरू असल्याचे मत लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी मांडले. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक पर संबोधनांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विचारानुसार परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांच्या मनातील दडपण, ताणतणाव दूर करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले परंतु देशातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याची काळजी ते घेत आहेत. परीक्षेपे चर्चा या उपक्रमांतर्गत पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनात आत्मविश्वासाची पेरणी करत असतात. पंतप्रधानांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर या पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे असे आवाहन डॉक्टर नाईक यांनी याप्रसंगी केले.
महामंत्री विक्रांत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशांमध्ये अतिशय सकारात्मक वातावरण असल्याचे नमूद करून २०१४ नंतर नव भारताच्या निर्मितीचे काम सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी विकासाच्या नव संकल्पना राबवून जगामध्ये भारताला शक्तिशाली देशाचा सन्मान मिळवून दिला आहे. स्पर्धेमधील विजेता विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि आकर्षक पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत.