अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २-४ परिसरात मूषक नियत्रंण मोहीम सातत्याने राबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २ आणि ४ परिसरात सिडको वसाहती व एलआयजी वसाहत आहे. या ठिकाणचे रहीवाशी उंदरांमुळे त्रस्त झाल आहेत. वाहनांच्या वायरी कुरतडणे, गॅलरीतील तुळस खाणे, दोरीवर वाळत घातलेले कपडे कुरतडणे यासह जमिन पोखरणे असे उद्योग या उंदरांकडून सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिक रहीवाशांकडून आमच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात येत आहेत. नेरूळ सेक्टर २ व ४ मध्ये असलेल्या महापालिकेच्या उद्यानामध्ये व क्रिडांगणामध्येही उंदरांनी ठिकठिकाणी पोखरल्याचे पहावयास मिळत आहे. उंदराच्या मागे नाग, सापही येत असल्याने स्थानिक रहीवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रविवारी, दि. ९ फेब्रुवारी रोजी महापालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणामध्ये जुईनगरमधील जुई व तिरंगा सोसायटीतील मुले खेळत असताना साप त्यांच्या निदर्शनास पडला होता. मैदानामध्ये उंदरांची बिळे असल्याने साप उंदरामागे सिडकोच्या सोसायटीमध्येही येवू लागले आहेत. या ठिकाणी आठवड्यातून दोन वेळा मूषक नियत्रंण मोहीम राबवून नेरूळ सेक्टर २ व ४च्या रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.