नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० तसेच सारसोळे गाव व कुकशेत गाव परिसरात मूषक नियत्रंण मोहीम सातत्याने राबविण्याची लेखी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती व प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गाव तसेच कुकशेत गावाचा समावेश होत आहे. या प्रभागात श्रमिकांची एलआयजी, सिडको वसाहती, साडे बारा टक्के भुखंडावरील इमारती, ग्रामस्थांच्या इमारती, चाळी, खासगी इमारती आहेत. या ठिकाणचे रहीवाशी व ग्रामस्थ उंदरांमुळे त्रस्त झाले आहेत. वाहनांच्या वायरी कुरतडणे, गॅलरीतील तुळस खाणे, दोरीवर वाळत घातलेले कपडे कुरतडणे यासह जमिन पोखरणे असे उद्योग या उंदरांकडून सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिक रहीवाशांकडून आमच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात येत आहेत. नेरूळ सेक्टर ६ व ८ मध्ये असलेल्या महापालिकेच्या उद्यानामध्ये व क्रिडांगणामध्येही उंदरांनी ठिकठिकाणी पोखरल्याचे पहावयास मिळत आहे. उंदराच्या मागे नाग, सापही येत असल्याने स्थानिक रहीवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मैदानामध्ये उंदरांची बिळे असल्याने साप उंदरामागे सिडकोच्या सोसायटीमध्येही येवू लागले आहेत. या ठिकाणी आठवड्यातून दोन वेळा मूषक नियत्रंण मोहीम राबवून नेरूळ सेक्टर ६,८,१० च्या रहीवाशांना तसेच सारसोळे व कुकशेतच्या ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.