अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील रहीवाशी उंदराच्या उपद्रवाने त्रस्त झाले असल्याने प्रभाग ३० मध्ये सातत्याने मूषक नियत्रंण मोहीम राबविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील प्रभाग ३० मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात अंर्तगत व बाह्य परिसरात तसेच संबंधित भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश होत आहे. प्रभाग ३० मध्ये गेल्या काही दिवसांपासून उंदरांच्या उपद्रवाने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. घरातील अथवा सोसायटी आवारातील वायरी कुरतडणे, पार्क केलेल्या वाहनाच्या वायरी कुरतडणे, गॅलरीतील तुळस नष्ट करणे, दोरीवर वाळत घातलेले कपडे कुरतडणे, जमिन पोखरणे आदी प्रकारामुळे सानपाडा नोडमधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. सानपाडा नोडमधील रहीवाशांना दिलासा देण्यासाठी प्रभाग ३० मध्ये व्यापक प्रमाणावर मूषक नियत्रंण अभियान सातत्याने राबविणे आवश्यक आहे. स्थानिक रहीवाशी उंदरांच्या वाढत्या त्रासाबाबत आमच्या जनसंपर्क कार्यालयात सतत तक्रारी करत असल्याने आम्ही आपणास हे लेखी निवेदनपत्र सादर करत असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
समस्येचे गांभीर्य व रहीवाशांना होणारा त्रास पाहता संबंधितांना प्रभाग ३० मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात व सार्वजनिक उद्यानामध्ये व क्रिडांगणामध्ये व्यापक प्रमाणावर समस्येचे निर्मूलन होईपर्यत मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.