अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे शिष्यवृत्ती अर्ज पालिका प्रशासनाकडे सादर करु शकलेले नाहीत. हीच परिस्थिती सर्व नवी मुंबईतही आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे हित जोपासण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी पालिका प्रशासनाने मुदतवाढ देण्याची मागणी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तसेच प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासन इयत्ता पहिली ते पदवी व अन्य अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गरीब घरातील गुणवंत व हुशार मुलांना दरवर्षी शिष्यवृत्ती देत असते. गरीब व गरजू परिवारातील विद्यार्थ्यांना महागाईच्या काळात शिष्यवृत्तीचा हातभार लागत असतो. शिष्यवृत्ती हा खरोखरीच महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी राबविला जाणारा स्तुत्य व प्रशंसनीय कार्यक्रम आहे. दरवर्षी ऑफलाइन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना त्रास होत नव्हता. परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे पालकांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. अनेकदा पालिकेचा सर्व्हर डाऊन असणे, बॅंकाचा संप व सार्वजनिक सुट्यांमुळे बॅंका बंद, इंटरनेटची समस्या, बॅक खाते उघडणे तसेच उत्पन्नाचा दाखला काढणे यासाठी गेलेला वेळ पाहता पालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारी या दिलेल्या मुदतीत शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे असंख्य पालकांना शक्य झालेले नाही. प्रभाग ३४ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील अनेक विद्यार्थ्यांना अजून शिष्यवृत्तीचे अर्ज अडचणींमुळे दाखल करता आलेले नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०पर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.