अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन केले होते.
शिवजन्मोत्सव सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविले गेले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पारायण सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. तसेच स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, महिला संरक्षण प्रशिक्षण शिबीर, गड किल्ले संवर्धन (माहुली गड), कापडी पिशव्या वाटप असे निरनिराळे उपक्रम राबवण्यात आले. पारायण सोहळ्याचे औचित्य साधून विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ या पुस्तकाचे पारायण करण्यात आले. प्रातःकाली शिवज्योत महाविद्यालयात आणण्यात आली. या प्रसंगी शिवगर्जना देऊन आणि मग शिवआरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात लेझीम सादर करून ढोल-ताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली व सभागृहामध्ये शिवजन्माचा पाळणा, पोवाडा, जागर, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच प्रवक्ते सुदर्शन भोईर यांचे उत्स्फूर्त व प्रेरणादायी असे शिवव्याख्यान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सदर उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, उपप्राचार्य प्रा. सी.डी. भोसले, उपप्राचार्या डॉ. राजश्री घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व चेअरमन डॉ. एल. व्ही. गवळी, डॉ. पी.जी. भाले व प्रा. एन. नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याची माहिती एन.एस.एस. युनीटचे स्वयंसेवक ओमकार गोळे आणि नेहा जांभळे यांनी दिली