अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात असून आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या सार्वजनिक रुग्णालयांची महत्वाची भूमिका असून सर्वसामान्य माणसांसाठी हा आरोग्य दिलासा आहे.
त्यातही राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील अद्ययावत असा नवजात शिशू विभाग हा नवजात बालकांसाठी वरदानच ठरला आहे. ऐरोली परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकसंख्येचे प्रमाण जास्त असून त्यामुळे याठिकाणी अतिजोखमीची प्रकृती असणाऱ्या माता प्रसूतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी नवजात शिशू विभाग सुरु होणे ही अत्यावश्यक गरज होती. त्यास अनुसरून ३ सप्टेंबर २०१९ रोजी १२ बेडच्या व्यवस्थेचा नवजात शिशू विभाग ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयात सुरु झाला. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख व डॉ. सचिन बिरादार यांनी नवजात शिशू विभाग कसा असावा याचे सूक्ष्म नियोजन केले.
या विभागात समर्पित भावनेने काम करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड आणि परिसेवक श्री. प्रकाश बारवे यांनी परिचारिकांचा विशेष समुह निवडला. त्या समुहाला केईएम व ज्युपिटर सारख्या मानांकित रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. गरोदर मातांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात गुणात्मक उत्तम सेवा देणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली.
मागील ३ वर्षे ३ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ३ सप्टेंबर २०१९ पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत याठिकाणी १०५३ प्रसूती झाल्या असून याठिकाणी सर्वात कमी वजनाचे व कमी दिवसांचे प्रिमॅच्युअर बाळ हे २६ आठवड्यांमध्ये जन्मलेले ७५० ग्रॅम वजन असलेले होते. हे बाळ एनआयसीयू मध्ये ७३ दिवस होते. त्यावर सुयोग्य उपचार केल्यामुळे या बाळाची सर्व वाढ व विकास योग्यरितीने झाला असून हे बाळ आज ३ वर्षांचे झाले आहे.
विशेष म्हणजे या रुग्णालयात एक तिळेही जन्माला आले असून ही तिळी ३१ आठवड्यांमध्ये जन्मली होती. त्यांचे वजन अनुक्रमे १.४ कि.ग्रॅ., १ कि.ग्रॅ. व १.३ कि.ग्रॅ. होते. यापैकी २ नंबरच्या बाळाला पिन्युमोथोरॅक्स हा गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरही नवजात शिशू विभागाच्या वैद्यकीय समुहाने शल्य चिकित्सक डॉ. सागर होटकर यांच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या उपचार केला व ही तिन्ही बाळे ४९ दिवस एनआयसीयू मध्ये उपचार घेऊन सुखरूप घरी गेली.
सर्वसाधारपणे बाळाचे वजन ३.५ कि.ग्रॅ. पेक्षा जास्त नसते. या पेक्षा जास्त वजन असलेल्या बाळामध्ये आरोग्य विषयक गुंतागुंत निर्माण होऊन प्रसंगी बाळ दगावू शकते. या रुग्णालयात आत्तापर्यंतच्या कालावधीत सर्वात जास्त ४.५५ कि.ग्रॅ.वजनाचे बाळ जन्मले होते. या बाळालाही श्वास घेण्यासाठी तीव्र त्रास होत होता. तसेच पल्मनरी हायपरटेन्शन नामक आजार असल्याचे निदर्शनास येत होते. या बाळावर अत्याधुनिक पध्दतीने काळजीपूर्वक उपचार करण्यात आले व हे बाळही सुखरूप घरी गेले. याठिकाणाहून एमआयएससी – एन यासारखा गंभीर आजार असलेली ७ बालकेही व्यवस्थित उपचार घेऊन घरी गेली आहेत. रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात मागील ३ वर्षात १०५३ नवजात शिशूंपैकी केवळ ५१ अतिगंभीर परिस्थितीतील नवजात शिशू दगावले असून या विभागातील मृत्यू दर ४.८४ टक्के इतका कमी आहे. अतिउत्कृष्ट एनआयसीयू मानल्या जाणाऱ्या एनआयसीयूचा मृत्यूदरही यापेक्षा अधिक असतो. नवजात शिशू विभागातील मृत्यूदर ५ टक्केपेक्षा कमी असणे ही कामगिरी प्रशंसनीय मानली जाते. या सर्व यशोगाथा प्रातिनिधीक स्वरुपातील असून अशी बरीच उल्लेखनीय कामे ऐरोली रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागामार्फत कऱण्यात आलेली आहेत.
सद्यस्थितीत खाजगी एनआयसीयूमध्ये दिवसाला २५ ते ५० हजार रूपये इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च येतो. अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब गरजू रुग्णांकरिता हा विभाग एक प्रकारे वरदानच आहे. या विभागाच्या उभारणीकरिता तसेच विकासाकरिता तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी एन., अण्णासाहेब मिसाळ, अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष दिले असून विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांचेही विभागाच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांनीही विभागाच्या क्षमतावृध्दीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
नवजात शिशू विभागाच्या विस्ताराची गरज लक्षात घेऊन येथे बेडसची संख्या १२ वरून १७ बेडस अशी वाढविण्यात आलेली असून या विभागामध्ये ४ व्हेन्टिलेटर्स, मल्टिपॅरामॉनिटर, सिरींज पंप, फोटो थेरपी मशीन, बिलीमिटर अशी अद्ययावत उपकरणे आहेत. विशेष बाब म्हणजे याठिकाणी नवजात शिशूंवर म्युझिक थेरपीव्दारे उपचार केले जात आहेत. डॉ. अमोल देशमुख हे एनआयसीयू विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत असून त्यांच्यासोबत डॉ. पंडीत जाधव, डॉ. सचिन बिरादार, डॉ. निलेश आनंद, डॉ. मुकुंद शिरोळकर व डॉ. शिल्पा भोईटे हे डॉक्टर्स आपली सेवा बजावीत आहे. एनआयसीयूच्या नर्सिंग इंन्चार्ज म्हणून श्रीम. नलिनी झेंडे यांनीही मौलीक योगदान दिलेले आहे. एनआयसीयूच्या या उत्तम कामगिरीत बालरोग तज्ज्ञांपासून रुग्णसेवा करणाऱ्या आयांपर्यंत सर्वांचाच सक्रीय सहभाग आहे.
यापुढील काळातही हा नवजात शिशू विभाग अशाच प्रकारचे सेवाभावी कार्य अधिक जोमाने करत राहणार असल्याचा विश्वास राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांनी व्यक्त केला असून एनआयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. अमोल देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यासाठी कटिबध्द असणार आहे.