अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ मधील ओंकार सोसायटीलगतच्या विद्युत उपकेंद्र आवाराची सफाई करुन परिसराला आलेला बकालपणा संपुष्ठात आणण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महावितरणचे अभियंता तसेच महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
जुईनगर नोडमधील जुईनगर सेक्टर २४ मध्ये ओंकार सोसायटीलगतच्या विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) आहे. या सबस्टेशनच्या आवारात कचऱ्याचे, रॅबिट व डेब्रिजचे ढिगारे पडलेले आहेत. या विद्युत उपकेंद्राच्या सभोवतालच्या संरक्षक भिंतीही तुटल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या कचऱ्यामुळे स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसराला बकालपणाही आला आहे. संरक्षक भिंत तुटल्याने स्थानिक त्या ठिकाणी कचराही टाकत आहे. यामुळे डासांना पोषक वातावरण मिळून स्थानिकांमध्ये मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता आपण त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून तेथील कचरा, रॅबिट अथवा डेब्रिजचे ढिगारे तात्काळ साफ करावेत, त्यामुळे परिसराला आलेला बकालपणा नाहीसा होईल. तसेच संरक्षक भिंतीची डागडूजी करून उंची वाढविल्यास कोणी त्या ठिकाणी कचराही टाकणार नाही. लवकरात लवकर या समस्येचे निवारण करण्यात यावे असे साकडे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महावितरण व महापालिका प्रशासनाला घातले आहे.