अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला बकालपणा आणणाऱ्या विद्युत उपकेंद्राच्या (डीपी) डागडूजीसाठी महावितरणला निर्देश देण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरातील स्वच्छतेबाबत व येथील कामांबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्य व केंद्र सरकारकडून सातत्याने विविध पुरस्कारांचा वर्षांव होत असतो. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातही राज्यामध्ये नवी मुंबई शहराला सलग दोन वर्षे प्रथम क्रमाकांचा पुरस्कारही मिळालेला आहे. स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशामध्ये तिसरे तर कधी दुसरे आणि राज्यात प्रथम क्रमाकांचे पारितोषिकही मिळालेले आहे. परंतु या शहरात असलेल्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या (डीपी) दुरावस्थेमुळे शहराच्या सौंदर्यामध्ये अडथळा येवून शहराच्या बकालपणाला हातभार लागत आहे. या समस्येचे गांभीर्य या निवेदनातून पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न संदीप खांडगेपाटील यांनी केला आहे.
नवी मुंबई शहरात दिघा ते बेलापुरदरम्यान महावितरणच्या असंख्य विद्युत उपकेंद्र (डीपी)आहेत. या डीपी अनेकदा रस्त्याच्या कोपऱ्यावर, मैदानालगत, उद्यानालगत, गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतीलगत अथवा सार्वजनिक ठिकाणी आहेत. नवी मुंबई शहरामध्ये या डीपीपैकी किमान ८० ते ८५ टक्के डीपी दुरावस्थेत आहेत. या डीपीसभोवताली आवारातील जागेची महावितरणकडून कधीही सफाई केली जात नाही, त्या ठिकाणी स्वच्छता राखली जात नाही. या डीपीचे प्रवेशद्वारही तुटलेले असतात. तसेच संरक्षक भिंतींचीही पडझड झालेली असते. या डीपी आवारात डेब्रिजचे, रॅबिटचे अथवा अन्य कचऱ्याचे ढिगारे पडलेले आपणास पहावयास मिळतात. संरक्षक भिंतीवर बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्याही तुटलेल्या असतात. अनेक ठिकाणी विद्युत डीपीच्या अंर्तगत भागामध्ये गर्दुले नशापानी करताना पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी विद्युत डीपीच्या आवारात लहान मुलांकडून क्रिकेटही खेळले जात आहे. या ठिकाणी विद्युत प्रवाहाशी संपर्क होवून जिवितहानी झाल्यास जबाबदारी कोण स्विकारणार? असा प्रश्न संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे.
महापालिका प्रशासन एकीकडे शहर स्वच्छतेसाठी अभियान राबवित असताना, रंगरंगोटी, सुभाषिते यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना महावितरणच्या दुरावस्थेतील उपकेंद्र (डीपी) शहराच्या स्वच्छतेला काळीमा फासत आहे. येथील अस्वच्छता, दुर्गंधी ही साथीच्या आजारांना खतपाणी घालत आहे. विद्युत उपकेंद्रांचा बकालपणा त्या त्या भागामध्ये गलिच्छपणा निर्माण करत आहे. या समस्यांचे निवारण होत नाही तोपर्यत नवी मुंबई शहरातील स्वच्छता अभियान निरर्थक आहे. नवी मुंबई शहराला बकालपणा आणणाऱ्या विद्युत उपकेंद्राचा बकालपणा घालवून तेथे स्वच्छता राबवण्याचे व आवारातील समस्या सोडविण्याचे निर्देश महावितरण कंपनीला देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.