संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : १७ व्या डी वाय पाटील टी २० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात रिलायन्स १ ने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून रिलायन्स १ ने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकली आहे. १४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतला होता. प्रतिवर्षी प्रमाणेच प्रकाशझोतात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत नवी मुंबई, मुंबई आणि रायगड येथील सुमारे २०००० प्रेक्षकांनी हजेरी लावली.
या स्पर्धेचा अंतिम सामना डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात डी वाय पाटील बी संघांने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत रिलायन्स १ संघांने १५३ धावा बनविल्या. रिलायन्स १ तर्फे सर्वाधिक धावा हृतिक शोकीन यांनी ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. डी वाय पाटील बी संघांच्यावतीने बलतेज सिंग यांनी ४ बळी घेतले.
डी वाय पाटील बी संघांच्या वतीने खेळताना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला गेला आणि शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी २ धावांची गरज असताना, त्यांचा शेवटचा खेळाडू झेल देऊन बाद झाला. त्यामुळे रिलायन्स १ संघा ने एका धावेने हा अतिशय चुरशीचा सामना जिंकला.
डी वाय पाटील बी संघाच्या वतीने हार्दिक तामोरे यांनी ३४ चेंडूवर ४३ धावा केल्या. रिलायन्स १ संघातर्फे आकाश मढवाल यांनी ३ बळी घेतले. हृतिक शोकीन हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, डी वाय पाटील क्रिडा संकुलाचे अध्यक्ष आणि डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.