संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com @ gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रालयीन पातळीवरुन सातत्याने निधी आणत असतात, त्यासाठी मंत्रालयातील पायऱ्या झिजविताना, वेळ पडल्यास मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या दालनात चपला झिजविताना मंदाताईंना कोठेही कमीपणा वाटत नाही. बेलापुर विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी परिसरात सुविधा उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या निवासी परिसरात त्यांच्या राहणीमानाचा दर्जां उंचावण्यासाठी आमदार मंदाताईंच्या पाठपुराव्याला यश आले असून सीबीडी से-८ रमाबाई आंबेडकर नगर, नेरूळ शिवाजीनगर, नेरूळ गांधीनगर, तुर्भे हनुमाननगर या परिसरात विविध कामांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या झोपडपट्टी परिसराला व येथील झोपडपट्टीधारकांना मंदाताईंच्या पाठपुराव्यामुळे लवकरच ‘अच्छे दिन’ येणार असून मंदाताई म्हात्रे या आमच्यासाठी खऱ्या अर्थांने ‘मायमाऊली’ ठरल्या असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा / गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राज्य सरकार राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवत असते. या योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
आमदार मंदाताईंनी १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यातील ४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून उर्वरित ६ कोटी रुपयांचा निधी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे झोपडपट्टीधारकांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे.
मंदाताईंच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या ४ कोटी रुपयांच्या निधीपैंकी नेरूळ शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्र उभारणीसाठी- ५० लाख रुपये, नेरूळ गांधीनगर येथे बालवाडी उभारण्यासाठी- ५० लाख रुपये, नेरूळ गांधीनगर येथे समाजमंदिर बांधण्यासाठी- ५० लाख रुपये, नेरूळ गांधीनगर येथे जलकुंभ निर्मितीसाठी २५ लाख रुपये, तुर्भे हनुमाननगर येथे व्यायामशाळा बांधण्यासाठी २५ लाख रुपये, तुर्भे इंदिरानगर येथे समाजमंदिर निर्मितीसाठी ५० लाख रुपये, सीबीडी सेक्टर ८ रमाबाई आंबेडकरनगर येथील नाल्याला संरक्षक भिंत व पुल बांधणे यासाठी ५० लाख रूपये, सीबीडी सेक्टर ८ रमाबाई आंबेडकरनगर येथे समाजमंदिर बांधण्यासाठी ५० लाख रुपये, सीबीडी सेक्टर ८ रमाबाईनगर येथे उद्यान विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधांसाठी मागणी केली होती. तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची व आमदार मंदाताईंच्या परिश्रमाची राज्य सरकारने दखल घेतली असून त्यांच्या कार्यांची प्रशंसा करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. ४ कोटी निधीची तरतूद सरकारने मंजुर केली आहे. यातून आता बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे शक्य होणार आहे व तेथील रहीवाशांना सुविधा मिळणे शक्य होणार आहे. यापूर्वीही मंदाताईंनी ‘स्मार्ट व्हिलेज’साठी १० कोटींचा निधी दिवाळे गावासाठी सरकारकडून मंजुर करुन आणला आहे.