अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार येथील महापालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणात एका महिलेकडून बाईक रायडींगमुळे होत असलेली मैदानाची वाताहत थांबविण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची व मैदानाची नासाडी करणाऱ्या महिलेवर पालिका प्रशासनाच्या वतीने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक महिला नेरूळ सेक्टर चार येथील महापालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणावर दररोज येवून बाईक रायडींगचा सराव करत आहे. जोरदार वेगात बाईक नेणे व पुन्हा जागेवरच वळवून पुन्हा जोरात एका दिशेला नेणे असा बराच वेळ ती महिला सराव करते. तिला असे न करण्याबाबत समजावूनही काहीही फायदा होत नाही. क्रिडांगनाच्या नामफलकावर असलेले खेळ दाखवून असा प्रकार येथे करू नका. मैदान खराब होत आहे, गवत उखडले जात आहे, असे सांगूनही ती ऐकत नाही. अरे तुरेच्या भाषेत मी कर भरतेय, मी येथेच बाईक चालविणार सांगते. महिला असल्याने कोणी फारसे हुज्जत घालण्याच्या भानगडीत पडत नाही. समजावूनही फरक पडत नाही. ती बाईक चालवित असताना इतरांना खेळता येत नाही. धुळीचा मोठ्या प्रमाणावर खकाना उडत असल्याने खेळाडुंना सर्दी, खोकला सुरु झाला आहे. बाईक ज्या ठिकाणाहून वेगात ये-जा करते, त्या ठिकाणी क्रिडांगणाचे नुकसान होत आहे. गवत उखडले जात आहे. अन्य मुलांना खेळता येत नाही. विशेष म्हणजे हे क्रिडांगण क्रिकेट, हॉकी, फुटबॉल या खेळासाठी एका महिलेच्या अट्टहासामुळे मैदानाची नासाडी होत आहे. संतापाची बाब म्हणजे नेरूळ पालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणात हा प्रकार घडत असताना क्रिडांगणाची वाताहत थांबविण्यासाठी कोणताही पालिका अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेत नसल्याचा संताप संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
नेरूळमधील रामलीला मैदान, बामणदेव झोटींगदेव मैदान अशा मोठ्या मैदानावर कोणीही असले प्रकार खपवून घेणार नाही. येथे क्रिकेट खेळणारे नेरुळ सेक्टर २,४,६ मधील तसेच जुईनगरमधील क्रिकेटचे संघ समजुतदारपणे त्या महिलेला सांगत असतानाही ती अरेरावीची भाषा वापरत आहे. केवळ एक महिलेमुळे ते मैदान बाईक रायडींगचे नसतानाही मैदानाची वाताहत होत आहे. मुलांना फुटबॉल व क्रिकेट खेळता येत नाही. त्या मैदानावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विसावास्थळ आहे, आपण तेथेही खातरजमा करु शकता. समस्येचे गांभीर्य व मैदानाची होत असलेली नासाडी पाहता महापालिका प्रशासनाने त्या महिलेला त्या ठिकाणी करत असलेला बाईक रायडींगचा प्रकार थांबविण्यास मनाई करावी, ऐकत नसल्यास पालिका प्रशासनाच्या वतीने पोलिसांत महिलेविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच मैदानाचे होत असलेले नुकसान त्या महिलेकडून भरून घ्यावे. याबाबत आपण नेरूळ विभाग कार्यालयाला निर्देश द्यावेत. यातून क्रिकेट व फुटबॉल खेळणारी मुले आणि बाईक रायडींग करणारी महिला यांच्यात वाद होऊन अनुचित प्रकार घडल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.