संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोली, सेक्टर १५ येथील नवी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध’ या शृंखलेअंतर्गत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने सातत्याने आयोजित केली जात असून त्यांना विचारप्रेमी रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
अशाच प्रकारे शनिवार दि. ११ मार्च रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सयाजीरावांच्या जीवन चरित्राचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिध्द लेखक बाबा भांड यांचे ‘महाराज सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित केले आहे.
बडोदा संस्थानातील प्रजेसाठी आपल्या १८८१ ते १९३९ या कारकिर्दीत लोककल्याणकारी काम करणारे पुरोगामी युगद्रष्टे महाराजा म्हणून सयाजीराव गायकवाड यांची ओळख जनमानसात रुजलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात महाराजा सयाजीरावांनी बाबासाहेबांमधील हुषारी आणि गुणवत्ता हेरून त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिलेला प्रगतीचा हात अत्यंत महत्वाचा आहे. अशा लोकोपयोगी राजाचे सामाजिक, राजकीय कार्य या व्याख्यानाच्या माध्यमातून ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड उलगडविणार आहेत.
८५ हून अधिक पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती केलेले विख्यात साहित्यिक तसेच महाराजा सयाजीराव यांच्या चरित्राचे ज्येष्ठ ग्रंथ संशोधक असणारे बाबा भांड यांच्यासारखे सुप्रसिध्द व्याख्याते शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता सेक्टर १५, ऐरोली येथील ऐरोली मुलुंड पुलाजवळ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सभागृहात महाराजा सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महनीय व्यक्तीत्वांबद्दल संवाद साधणार असून रसिकांनी हा विचारठेवा अनुभवण्यासाठी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.