नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील नेरुळ – सीवूडस येथील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या घरांच्या प्रश्नाने आजमितीस उग्र स्वरूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या ज्वलंत समस्यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला यासाठी बेलापूरच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे व पुनर्विकास अभ्यासक सुनील चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीवूडस येथील सेक्टर ४८, गणेश मैदान या ठिकाणी शनिवार १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता पुनर्विकास परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे निमंत्रक माजी नगरसेवक भरत जाधव यांनी कळविले आहे .
सिडको प्रशासनाने डीआरएस ८७ योजनेअंतर्गत सीवूडसमध्ये सेक्टर ४६ ,४८, ४८ए या ठिकाणी ३२ गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून एकूण ३८२४ बांधलेल्या सदनिकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याकारणाने सुरुवातीपासून आजपर्यंत इमारतींना तडे जाणे, स्लॅब कोसळणे, पाणी गळती अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे बऱ्याच रहिवाशांना इजा देखील झालेल्या आहेत. सुदैवाने अद्याप पर्यंत कोणती जीवित हानी झाली नाही. या विषयी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी वारंवार सिडकोकडे आंदोलने करून पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच सदनिकाची दुरुस्ती देखील सिडकोनी करून दिलेली आहे.
या गंभीर समस्यांचा एकमेव पर्याय म्हणजे या ३२ गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करणे हाच एकमेव पर्याय आहे. परंतु पुनर्विकास करताना त्याबाबतची सर्व माहिती कायदेशीर व प्रशासकीय बाबी, पुनर्विकासाचे नफे-तोटे, पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्ष बंद का पडतात ? या विषयाची माहिती सर्व गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी मंडळाला व प्रत्येक सभासदांना मिळावी म्हणूनच पुनर्विकास परिषदेचे आयोजन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुनील चौधरी पुनर्विकास विषयाचे अभ्यासक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे
मागील २० दिवसापूर्वी पुनर्विकास परिषदेबाबत जनजागृतीला सुरुवात केल्यानंतर आजमितीला अनेक विकासकांचे वा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ( PMC ) यांनी आपणाशी संपर्क साधल्याचे भरत जाधव यांनी सांगितले. सीवूडस प्रमाणेच वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, पनवेल या परिसरातील पुनर्विकासाचे प्रकल्प बंद पडलेल्या बऱ्याच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्कही केला. भविष्यात आपल्या गृहनिर्माण संस्थेत त्या प्रकारची परिस्थिती उद्भवू नये किंवा आपला पुनर्विकासाचा प्रकल्प बंद पडू नये व आर्थिक दुर्बल नागरिक बेघर होऊ नये हाच पुनर्विकास परिषद आयोजित करण्याचा उद्देश असून सर्व गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी मंडळाने व प्रत्येक सदनिकेमधील किमान एका मुख्य व्यक्तीने पुनर्विकास परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी रहिवाशांना केले आहे.