संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांसुविधांचा तसेच शहरात सुरु असलेल्या विविध सुविधा कामांचा सविस्तर आढावा घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अधिक गतीमान कार्यपूर्ततेचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध विभागात मार्केटच्या वास्तू बांधून तयार आहेत तेथील जागांचे अधिकृत विक्रेत्यांना लॉटरीद्वारे वितरण करुन त्या जागा तत्परतेने वापरात याव्यात, याबाबतची कार्यवाही जलद करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
मंगल कार्यालयांच्या वास्तू सर्वसामान्य माणसांच्या लग्नादी समारंभाना उपयोगी पडतात, हे लक्षात घेऊन लग्नसराईचा कालावधी जवळ आल्याने नव्याने बांधून तयार असलेली मंगल कार्यालये व समाजमंदिरांच्या वास्तू आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया जलद करुन लवकरात लवकर वापरात येतील, याकडेही काटेकोर लक्ष देण्याचेही निर्देश आयुक्तांनी सबंधित विभागाला दिले.
मोकळया मैदानामध्ये विविध समारंभाना देण्यात येणाऱ्या परवानगीमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर आयोजकांनी ती जागा स्वच्छ करुन देण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपविण्यात आलेली आहे. तथापि कार्यक्रम झाल्यानंतर ती जागा स्वच्छ न करता आहे तशीच कचरा पडलेल्या स्थितीत आयोजकांकडून अस्वच्छ ठेवली जात असल्याचे बहुतांशी ठिकाणी निदर्शनास येत आहे. सदर जागा वापराचे अनामत शुल्क अत्यंत अल्प असल्याने अनामत रक्कम जप्त केली तरी आयोजकांना फारसे आर्थिक नुकसान होत नाही. त्यामुळे अस्वच्छतेच्या या बाबीकडे आयोजकांकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र यामुळे मैदानात अस्वच्छता होत असल्याने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने या बाबीकडे कटाक्षाने लक्ष देत अनामत रक्कम वाढवावी लागेल, याही पर्यायावर सर्वांगीण विचार करण्यात आला. अशीच परिस्थिती मंगल कार्यालयांची असून त्याबाबतही विचार करण्यात आला.
शहरात विविध ठिकाणी सिडकोच्या अखत्यारितील मोकळे भूखंड असून संबंधितांचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने तेथे अस्वच्छता झाली आहे. त्याचप्रमाणे अशा जागांवर डेब्रीज टाकण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे शहर अस्वच्छ होत असून अशा मोकळया जागांचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन त्याची विभागवार यादी आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कुठेही लागणारे अनधिकृत होर्डींग शहर विद्रुपीकरण करीत आहेत. त्याबाबतही नियमित कारवाई करण्याचे निर्देशित करण्यात आले.
उदयाने, मैदाने अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा उघडयावर टाकून जाण्याची लोकांची मानसिकता बदलण्यासाठी अधिक व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत उद्यानासारख्या नागरिकांच्या विरंगुळ्याच्या ठिकाणी जिथे सकाळी लवकर नागरिक मॉर्निंग वॉकला येतात तेथे सकाळी लवकर साफसफाई सुरु करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
विविध विभागात असलेली सार्वजनिक व सामुदायिक शौचालये सुस्थितीत असतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे सूचित करताना आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या रोजच्या शौचालय तपासणीमध्ये केवळ शौचालयांमधील स्वच्छता न बघता त्यासोबतच तेथील आवश्यक सुविधांमधील अडचणींकडे तसेच शौचालय स्थितीकडेही लक्ष द्यावे व संबधित विभागाच्या अभियंत्यांना कळवून आवश्यक सुधारणा करवून घ्याव्यात असेही आयुक्तांनी निर्देशीत केले.
विभागनिहाय नेमलेल्या नोडल अधिका-यांनी आपले पाहणी दौरे नियमीत सुरु ठेवावेत व आपली निरीक्षणे गुगल स्प्रेड शीटवर भरावीत असे सूचित करतानाच आयुक्तांनी ही माहिती पुढील बैठकीत सादर करण्यास सांगितले.
विविध विभागात नागरी आरोग्य केंद्रांची बांधकामेही पूर्ण झाली असून ती लवकरात लवकर सुरु करुन नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जलद कारवाई करावी अशा सूचना आरोग्य विभागास देण्यात आल्या.
तरुणांना खेळण्यासाठी चांगल्या दर्जाची मैदाने उपलब्ध् करुन देण्याच्या दृष्टीने क्रीडा विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व मैदानांचे सर्वेक्षण करावे व अभियांत्रिकी विभागाशी समन्वय साधून खेळनिहाय मैदानांचा विकास करता येईल काय या पर्यायाचा विचार करण्यात यावा असे सांगितले. यासाठी क्रीडा विभागाने सर्व मैदानांचे सर्वेक्षण करून त्या त्या खेळांच्या स्वरुपानुसार मैदान विकसीत करता येईल काय तसेच नवी मुंबईतून दर्जदार खेळाडू निर्माण करण्याच्या दृष्टींने विशिष्ट खेळांचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देता येईल काय, याचा कृतीआराखडा अभियांत्रिकी विभागाशी समन्वय साधून तयार करावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
माझी वसुंधरा अभियानात नवी मुंबई हे राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर असून आपला नंबर टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे अभियानाच्या छोट्या छोट्या बाबींकडे बारकाईने लक्ष देत आवश्यक ती कार्यवाही संबंधित विभागाने वेळेत करावी तसेच शासकीय पोर्टलर्वर भरणे आवश्यक आहे ती माहिती विहित वेळेत अपलोड करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
यावेळी विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यार्थी गणवेश, पीएम स्वनिधी अशा शिक्षण व सेवा विषयक विविध बाबींचा आयुक्तांनी विस्तृत आढावा घेतला. स्वच्छता व सुंदरता ही आपल्या शहराची ओळख असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देत आयुक्तांनी स्वच्छतेसोबतच जलसाक्षरता सप्ताहाचे औचित्य साधून नागरिकांना कचरा वर्गीकरण तसेच जलबचतीचे आवाहन केले आहे.