सिडकोने केला वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर – रचले भविष्यासाठी आव्हानात्मक उद्दिष्ट
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडकोने वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करत भविष्यासाठी आव्हानात्मक उद्दिष्ट रचले आहे. नगर विकास क्षेत्रातील अग्रणी प्राधिकरण म्हणून ५० वर्षांहून अधिक काळ सिडकोची यशस्वी वाटचाल राहिली असून शहर निर्मितीचा ध्यास घेतलेल्या सिडकोने आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या सिडकोने नवी मुंबईतील नागरिकांना सिडकोद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळाव्यात याकरिता ई-प्रशासनाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य केले आहे.
या वर्षी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली सिडकोने वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचला आहे. या अर्थसंकल्पाचा गाभा चार तत्त्वांवर आधारित असून सर्वसामान्य नागरिकांच्या लहानसहान गरजांची पूर्तता करणारा आहे. सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील पहिले तत्त्व “पारदर्शकता” हे असून महामंडळाच्या शेवटच्या लाभार्थ्याकरिता निधीच्या होणाऱ्या उपयोगाचे सुस्पष्ट आणि उत्तम आकलन याद्वारे होणार आहे.
दुसरे तत्त्व “उत्तरदायित्व” हे असून याद्वारे महामंडळाची जबाबदारी आणि दायित्व उत्तमरीत्या स्पष्ट होत आहे. योग्य नियोजनाद्वारे आपले ध्येय साध्य करण्याबाबत महामंडळाला मार्गदर्शक ठरणारे हे तत्त्व असून वर्षभरातील महामंडळाच्या कामकाजाला योग्य दिशाही या तत्त्वाद्वारे मिळणार आहे.
सिडकोने अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेले तिसरे तत्त्व म्हणजे “उत्तम लेखांकन प्रथा” (बेटर अकाउंटिंग प्रॅक्टिसेस). कोणत्याही संघटनेला चढउतारांना सामोरे जावे लागते व सिडकोही त्यास अपवाद नाही. कोविड महासाथीच्या आधीच्या व दरम्यानच्या वर्षात अनेकदा सिडकोच्या आर्थिक स्थैर्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. परंतु डॉ. मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने उत्तम लेखांकन प्रथांची अंमलबजावणी करून चांगले यश मिळवत, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये उच्चतम महसूल प्राप्त केला आहे. हेच तत्त्व २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना अवलंबिण्यात आले.
या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सिडकोतर्फे उपयोजित करण्यात आलेले चौथे व शेवटचे तत्त्व म्हणजे “कामगिरी” (परफॉर्मन्स). हे अर्थसंकल्पातील कार्यवाहीचे निदर्शक तत्त्व आहे. केवळ आकडेवारी सादर न करता सिडकोने चांगल्या कामगिरीसाठी स्वत:करिता ध्येये, उद्दिष्टे आणि लक्ष्य आखून घेतली आहेत. या तत्त्वाद्वारे ‘पैशाचा स्रोत व पैशाचा विनियोग’ सुस्पष्ट होत असून या अर्थसंकल्पाद्वारे, एकंदर देशाच्या विकासाकरिता योगदान देणाऱ्या महामंडळाच्या महत्त्वकांक्षी आणि गतिमान प्रकल्पांकरिता वाटपित करण्यात आलेले निधीचे आवश्यकतेनुसार वितरण दर्शविण्यात आले आहे. म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता सिडको महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याकरिता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, नवी मुंबई मेट्रो, सिडको महागृहनिर्माण योजना, पाणी पुरवठा, रेल्वे, नवीन शहरे इ., महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकरिता पुरेशा निधीचे वाटप करण्यात आले आहे.
सिडको अर्थसंकल्प – एक दृष्टीक्षेप
अर्थसंकल्पीय अंदाज (खर्च) | ||
अनु क्र. | प्रकल्प | निधी (लाखामध्ये) |
1 | सर्वसाधारण अंदाजपत्रक (विपणन, शहर सेवा, अग्निशमन, विमानतळ, पालघर, प्रशासन, आस्थापन खर्च, इ.) | ४,१५,६१४.५१ |
2 | सिडको महागृहनिर्माण | ३,७५,१५१.८३ |
3 | नवी मुंबई मेट्रो | ८९,१८०.०६ |
4 | सिडको पाणी पुरवठा | ५७,२२२.१८ |
5 | रेल्वे | ३८,१३४.९७ |
6 | नैना | ५०,१४७.२३ |
7 | नवीन शहरे | २४,३५२.२५ |
एकूण | १०,४९,८०३.०३ |
सिडकोने या वर्षी प्रथमच १०,४९,८०३.०३ लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करून देशाच्या विकासाप्रति असलेली आपली जबाबदारी आणि दायित्वाचे दर्शन घडवले आहे. सन २०२२-२३ करिताचा अर्थसंकल्प हा देखील ७,८०,९८८.८४ लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेचा होता व प्रचंड महसूल निर्माण करणारा ठरला.
नवी मुंबईतील नगर नियोजन आणि विकासाची जबाबदारी असलेल्या सिडकोने मागील दोन वर्षांत १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अत्यंत वेगाने व यशस्वीरीत्या केली असून यामुळे सिडकोला राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांकडून उपलब्ध होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला प्रकल्पाची सुरुवात होण्याअगोदरच फायनान्शियल क्लोजर सादर करणाऱ्या महामंडळांपैकी सिडको एक आहे. सिडकोच्या अर्थसंकल्पातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, उत्तम लेखांकन प्रथा आणि कामगिरी या तत्त्वांच्या द्वारे राज्याची आणि महामंडळाची प्रगती साध्य करण्याचे सिडकोचे ध्येय सुस्पष्ट होत आहे.
000
‘आर्थिक वर्ष २०२३-२४ सुरू होत असताना मागील वर्षातील महामंडळाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी समाधानी असून मला महामंडळाच्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. कोविड महासाथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करत, महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नवी मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सतत प्रयत्नरत राहून महामंडळाचे ‘शहरांचे शिल्पकार’ हे बोधवाक्य सार्थ केले आहे.’
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको