श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेपर्यंत आणि युवा पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईमध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेमध्ये हजारो सावरकर प्रेमी नागरिकांनी रणरणत्या उन्हातही सहभाग घेतला.
आमदार गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती या गौरव यात्रेला लाभली. त्यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार व नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जाणारे संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत युवा नेते संकल्प नाईक, सावरकर विचार मंच नवी मुंबईचे संतोष कानडे , सुनिकेत हांडेपाटील आदी मान्यवरांनी या गौरव यात्रेत भाग घेतला.
वाशी येथील हॉटेल ब्लू डायमंड पासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला ढोल-ताशांच्या गजरात आणि सावरकरांच्या देशभक्तीपर गाण्यांनी शुभारंभ झाला. यात्रेत सहभागी सावरकर प्रेमींनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यांनी वातावरण भगवेमय झाले होते. ‘मी सावरकर’ आणि ‘आम्ही सारे सावरकर’ घोषवाक्य असलेले फलक सावरकर प्रेमींनी हातात धरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही गौरव यात्रा वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचली. या ठिकाणी झालेल्या सांगता सभेमध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आपले विचार मांडले. देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वोच्च पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतानाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमान जनक वक्तव्य करीत आहेत. हे आरोप करणाऱ्यांचे दुर्भाग्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकणार नाही असे सांगून लोकनेते नाईक यांनी आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि मातृभक्ती याविषयीचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचे कार्य समजावे यासाठी आजच्या गौरव यात्रेचे आयोजन केल्याचे सांगितले.
०००
सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही : संजीव नाईक
माजी खासदार संजीव नाईक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही असा इशारा देण्यासाठी शिवसेना, भाजपा आणि सावरकर प्रेमींनी आजची गौरव यात्रा आयोजित केल्याचे नमूद केले. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा सन्मान केला असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र वारंवार सावरकरांचा अवमान करीत आहेत. हा अपमान आता खपवून घेतला जाणार नाही.
००
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य युवा पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी- संदीप नाईक
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य आजच्या युवा पिढीसाठी दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावरकरांचा सिंहाचा वाटा तर होताच शिवाय समाज सुधारक म्हणून देखील त्यांचे कार्य मोठे आहे. अस्पृश्यता निवारण, स्वदेशीचा पुरस्कार, सदृढ समाजासाठी युवकांमध्ये व्यायाम प्रसार आणि प्रचार या विषयात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम काही प्रवृत्ती करीत आहेत. त्याचे खंडन केले पाहिजे, असे नवी मुंबईचे विकासपर्व आणि ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी सांगितले..
००
सावरकर प्रत्येक युवकांच्या हृदयात : सागर नाईक
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य कोणी पुसण्याचा विचार केला तरी ते शक्य नाही. काही पक्ष घाणेरडे राजकारण करीत आहेत असा आरोप करीत माजी महापौर सागर नाईक यांनी जनतेला स्वातंत्र्याचा इतिहास माहित आहे. सावरकरांचे योगदान माहित आहे असे म्हटले.