श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी आजच्या पिढीला माहिती होण्यासाठी भाजपा नवी मुंबई आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर पामबीच मार्ग ते वाशी शिवाजी चौक पर्यंत वीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या गौरव यात्रेत बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे , शिवसेना उपनेते विजय नाहटा , शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री विजय घाटे, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, महापालिका माजी सभागृह नेते रविंद्र इथापे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पांडुरंग आमले , माजी नगरसेवक अशोक गुरखे, डॉ. जयाजी नाथ, युवा महिला मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू, कमलेश वर्मा, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, रोहिदास पाटील, भाजपाचे सुनील पाटील, यासह मोठ्या संख्येने भाजपा शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली गेली. नंतर त्यांनी ‘मी माफी मागणार नाही, मी गांधी आहे, सावरकर नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यात पुन्हा सावरकर समर्थकांत असंतोष निर्माण झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात ‘स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर गौरव यात्रेची’ घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत ही गौरव यात्रा काढण्यात आली . या गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलूंसह माहिती प्रदर्शित करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे अभूतपूर्व योगदान समाजातील सर्व घटकांतील वर्गापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या निमित्ताने करण्यात आल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा व भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले .
राहुल गांधी सावरकर यांच्या विषयी केलेले वक्तव्य हे पोरकटपणाचे आहे. त्यांच्या घटक पक्षातही एकमत नाही. सावरकर यांच्या विषयी केलेले वक्तव्य अत्यंत दूषित असून आजच्या पिढीला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचे शिवसेना संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक किशोर पाटकर यांनी सांगितले . ही गौरव यात्रा बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या प्रवेशद्वारापासून निघूाली व तेथून ती पामबीच मार्गे वाशी सेक्टर १७ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून यात्रेची सांगता करण्यात आली.