अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई मध्ये नव्याने सुरु होत असलेल्या मेट्रो लाईन – १ या स्थानकाला आरबीआय मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्याचा घाट सिडको प्रशासन कडून सुरु आहे. आरबीआयच्या नावास आमचा विरोध असून वाघेश्वर मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांचे चिरंजीव आर के पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नेरुळ येथील डी. वाय. पाटील विद्यापिठाने आयोजित दिक्षांत समारंभाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी निवेदन सादर करतांना माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, रोहिदास पाटील, नवी मुंबई युवा सेना शहर प्रमुख नयन पाटील, आर के पाटीलसह असंख्य भूमिपुत्र हजर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करून वाघेश्वर हिल मंदिर (डोंगर ) हे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील इतिहासकालीन पुरातन व प्राचीन मंदिर असून ठाणे बेलापूर पट्टीमध्ये वाघेश्वर मंदिर क्षेत्र ही वास्तू सर्वांना परिचित व प्रसिद्ध आहे. नवी मुंबई शहर हे आताचे नव्याने विकसित झालेले शहर आहे. सिडकोने शहर वसविताना आरबीआय वसाहत विकसित केली आहे. त्यामुळे आरबीआय वसाहत ही पुरातन वास्तू म्हणून मोडत नाही. तसेच ही वसाहत रायगड जिल्ह्यात येत आहे. वाघोबा मंदिर हे ठाणे बेलापूर पट्टीतल्या भूमिपुत्रांचे पवित्र क्षेत्र असून स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे श्रद्धा स्थान आहे. वाघेश्वर हिल मंदिर (डोंगर )हे इतिहासकालीन पुरातन व प्राचीन वास्तू असून इतिहास सिडको पुसू शकत नाही. या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले असता वस्तुस्थिती सांगितल्यावर ही प्राचीन वास्तू रायगड हद्दीत येत नाही. सिडकोने आरबीआय मेट्रो लाईन – १ हे नाव न देता वाघेश्वर मेट्रो स्टेशन किंवा वाघेबा मेट्रो स्टेशन लाईन – १ असे नामकरण करावे. या नामकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक आमदार, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. सिडकोने आमच्या स्थानिक ग्रामस्थांचे दैवत असलेल्या वाघेश्वर किंवा वाघोबा मेट्रो स्टेशन असे नामकरण केले नाही तर आम्ही निश्चितच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ही माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांचे चिरंजीव आर.के.पाटील यांनी दिला आहे.