संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव ‘ज्ञान हीच शक्ती’ या संदेशास अनुरूप साजरा व्हावा या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिका मागील वर्षापासून सेक्टर १५, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘जागर’ या शिर्षकांतर्गत व्याख्यानमाला आयोजित करीत आहे. हा उपक्रम नागरिकांच्या इतका पसंतीस पडला असून येथील व्याख्यानांना हाऊसफुल्ल गर्दी असते. सभागृह गच्च भरल्यानंतर अगदी स्मारकाच्या बाहेरील एलईडी स्क्रीनसमोरही मोठ्या संख्येने उपस्थित रसिक थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतात.
यावर्षी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागर २०२३’ मध्ये श्री. राजीव खांडेकर, श्री. नामदेव काटकर (अंजना) आणि डॉ. नरेंद्र जाधव या तीन मान्यवरांच्या व्याख्यानांप्रमाणेच जयंतीच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणाऱ्या युवा पिढीच्या ६ व्याख्यात्यांच्या विशेष सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ या शिर्षकांतर्गत आयोजित सुसंवादात नीरज ताकसांडे, प्रफुल्ल शशिकांत, आनंद इंगळे, प्रवीण निकम, अविनाश उषा वसंत आणि डॉ. पद्मजा राजगुरू अशा युवा पिढीच्या ६ कर्तृत्ववान प्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव कथन करीत त्यांच्या यशोवाटचालीतील ज्ञानाला महत्व देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचे महत्व अधोरेखीत केले.
सामाजिक उद्योजक श्री. प्रफुल्ल शशिकांत यांनी ‘बाबासाहेबांची प्रेरणा आणि मोफत आधुनिक शिक्षणाची चळवळ’ या विषयावर संवाद साधताना बाबासाहेबांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशाशिवाय कोणताही माणूस स्वत:चा विकास करू शकत नाही असे स्पष्ट करीत बाबासाहेबांचे तत्वज्ञान संस्थेच्या ‘व्होपा’ नावात आणले आणि त्यानुसार संविधानावर आधारित शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन उपेक्षितांसाठी काम करीत असल्याचे सांगितले. व्यवस्था ही घोड्यासारखी असते आणि आपण त्यावर स्वार व्हायला पाहिजे असे सांगत त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केवळ ५ वर्षात ३० लक्ष विद्यार्थी व १ लाखाहून अधिक शिक्षकांसाठी विकासात्मक काम करता आले याचा आनंद व्यक्त केला.
‘उच्चशिक्षणाची परिभाषित सीमा ओलांडण्यासाठी’ या विषयाच्या अनुषंगाने बोलताना ॲड. प्रवीण निकम यांनी बाबासाहेबांचे ऋण व्यक्त करीत शिक्षणामुळे विचारांना दिशा मिळते, मनाला स्वातंत्र्य लाभते असे सांगत ‘समता सेंटर’च्या माध्यमातून समाजनिर्मिती, नेतृत्वगुण आणि संवाद ही महत्वाची कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या मूलगामी कार्याची अनेक प्रसंग सांगत माहिती दिली. उच्च शिक्षण, नेतृत्व विकास व शिक्षकांची क्षमतावृध्दी या अनुषंगाने सुरू असलेल्या रचनात्मक कार्याविषयी त्यांनी अनुभवकथन केले.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी सुरू केलेल्या ‘क्वान्टस्टिक’ जाहीरात एजन्सीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर यशस्वी झालेल्या आनंद माणिक इंगळे यांनी आपल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये असलेल्या मुलांनी नोकरीच करावी या मानसिकतेवर भाष्य करीत पालकांनी ही मनोभूमिका आता बदलली पाहिजे असे सांगितले. कुटुंबात पहिल्या पिढीतील उद्योजक होणे जरा कठीण असते पण अशक्य नाही हे लक्षात घेऊन तरूणाईने प्रेरणा घ्यावी असेही ते ‘उद्योजकतेचे बीज रोवूया’ या विषयाच्या अनुषंगाने म्हणाले.
लहानपणापासूनच अत्यंत जिज्ञासूपणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभलेले उद्योजक नीरज ताकसांडे यांनी ‘उद्योजकतेचा प्रवास’ मांडताना मुलांमध्ये लहान वयापासूनच कौशल्य विकास व्हावा यादृष्टीने ‘रिअल स्कुल’ ही संकल्पना राबवित असल्याचे सांगितले. माहिती व ज्ञानापेक्षा आपण मुलांच्या अंगभूत कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे असे स्पष्ट करीत त्यांनी लहानपणापासूनची त्यांची जडणघडण अनेक रंजक प्रसंगातून सांगितली. ‘एक्सप्रेस बाईक वर्क्स’ ही बाईक स्वच्छ करण्याची बाईकर्समध्ये प्रचंड लोकप्रिय असणारी अभिनव यंत्रणा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगत त्यांनी कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडविण्याचे उद्दिष्ट कथन केले.
बाबासाहेब व इतर महामानवांची चरित्रे वाचल्यानंतर प्रेरणा मिळाली व आपल्यातील उत्तमाचा शोध घेऊन आपल्या क्षेत्रात बेस्ट असणे गरजेचे असते असे अनुभव कथन करीत चर्मोद्योग क्षेत्रात केपी इन्डस्ट्रिजच्या माध्यमातून ‘दा ऑरा’ या ब्रान्डच्या निर्मात्या उद्योजिका डॉ. पद्मजा राजगुरू यांनी सतत प्रयोगशील रहा, योग्य आर्थिक नियोजन करा, आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी झोकून देऊन काम करा आणि हाती घेतलेल्या कामात नाविन्यपूर्णता आणा अशा ४ ‘उद्योजकता मानसिकतेसाठी महत्वाच्या गोष्टी’ विविध उदाहरणे देत सांगितल्या.
अनेक क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिध्द करणाऱ्या ‘बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पर्यावरणशीलता’ हा एक महत्वाचा गुण असल्याचे सांगत पर्यावरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते व साहित्यिक श्री. अविनाश उषा वसंत यांनी बाबासाहेबांच्या जीवनवाटचालीतील पर्यावरणाशी संबधित विविध प्रसंग मांडले. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या अनेक संधी असून समन्यायी पर्यावरणाचा गांभिर्याने विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या सुसंवादास सुरूवात करताना सहाही वक्त्यांनी हे स्मारक सर्वार्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे यथार्थ दर्शन घडविणारे ‘ज्ञानस्मारक’ असल्याचे अभिमानाने सांगितले. ‘जागर’ मधील इतर कार्यक्रमांप्रमाणेच या युवक सुसंवादाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास तरूणाईचे विचार जाणून घेण्यासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जागर’च्या यशस्वी आयोजनात नवी मुंबई महानगरपालिकेस महाराष्ट्र राज्यातील गावाखेड्यात वाचन संस्कृती रूजविण्यासाठी मौलिक कार्य करणाऱ्या प्रफुल्ल वानखेडे स्थापित ‘लेट्स रीड फाऊंडेशन’चे अनमोल सहकार्य लाभले.